चंद्रपूर : प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत जिल्ह्यात खरीप २०२०-२१ मध्ये तब्बल २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ हजारांची रकम विमा (प्रीमियम) कंपन्यांकडे जमा करण्यात आली होती. परंतु, पीक नुकसानीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना फक्त २६ कोटी २५ लाख ८३ हजार ९२२ हजारांचीच रकम वाटण्यात येणार आहे. प्रत्यक्षात जमा आणि मोबदल्याच्या रकमेतील तफावत लक्षात घेतल्यास पीक विम्याच्या नावावर विमा कंपन्याच मालामाल होत आहेत.
जिल्ह्यात भात लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पण, दरवर्षी खरीप हंगामात कापूस, सोयाबीन व अन्य कडधान्य लागवडीचे क्षेत्र वाढताना दिसते. शेतीवरचे संकट कायम असल्याने आर्थिक कोेंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेला पसंती दिली. गतवर्षी खरिपात तब्बल ९७ हजार ३४७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. कर्जदार शेतकऱ्यांचा विमा हप्ता बँकेतूनच कापण्यात आला. पीक विमा अंतर्गत येणारे खरीप लागवडीचे क्षेत्र ६८ हजार ९५९ हेक्टरपर्यंत विस्तारले. विमा काढणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रीमियम म्हणून ७ कोटी ३६ लाख ७ हजार ६३० रुपयांची रक्कम विमा कंपन्यांकडे जमा केली. याशिवाय राज्य व केंद्र सरकारने प्रत्येकी १४ कोटी १२ लाख ८४ हजार ५६४ प्रमाणे २८ कोटी २५ लाख ६९ हजार १२८ आणि ग्रास प्रीमियम मिळून एकूण विम्याची रक्कम २९६ कोटी ५३ लाख ४२ हजार १९३ रुपये विमा कंपन्यांकडे जमा केले आहेत.
५१ हजार १५० शेतकरी पीक विम्यातून बाद
आतापर्यंत १० हजार ३२७ शेतकऱ्यांना ३ कोटी ४० लाख ५३ हजार ३१२ रुपयांचा विमा मोबदला वाटप करण्यात आला. जिल्ह्यातून ९७ हजार ३४७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. त्यापैकी ४६ हजार १९७ लाभास पात्र ठरले, तर ५१ हजार १५० शेतकरी विम्यातून बाद झाले आहेत.
२५५ शेतकऱ्यांनाच स्थानिक आपत्तींतर्गत लाभ
स्थानिक आपत्तींतर्गत पिकांचे नुकसान झालेल्या २५५ शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळणार आहे. मीड टर्म नुकसान श्रेणीत १४ हजार ७० शेतकरी आणि काढणीनंतर नुकसान झालेल्या श्रेणीत ११७ शेतकरी पीक विम्यासाठी पात्र ठरले आहेत.
कृषी विभागाचा दावा...
विम्यासाठी पात्र ठरलेले शेतकरी व मंजूर भरपाईच्या रकमेची माहिती संबंधित विमा कंपन्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाला सादर केली. त्यानुसार, पीक विमा हक्काची २६ कोटी २५ लाख ८३ हजार ९२२ रुपयांची रकम ४६ हजार १९७ शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. उत्पन्नावर हक्क रक्कम अंतर्गत ४५ हजार ९९३ शेतकरी पात्र ठरले. विमा काढणाऱ्यांची जिल्ह्यात संख्या दरवर्षी वाढत आहे. मात्र, निकषात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनाच विम्याचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या कमी आहे, असा दावा कृषी विभागाने केला.
जिल्ह्यातील पीक विमा स्थिती (खरीप २०२०-२१)
पीक विमा लागवड क्षेत्र - ६८,९५९
विमा काढणारे शेतकरी - ९७,३४७
शेतकरी हिस्सा रक्कम - ७,३६,०७,६३०
राज्य सरकार - १४,१२,८४,५६४
केंद्र सरकार - १४,१२,८४,५६४
एकूण जमा रकम - २,९६,५३,४२,१९३
नुकसानभरपाई रकम - २६,२५,८३,९२२
लाभार्थी शेतकरी - ४६,१९७
प्रत्यक्षात लाभार्थी - १०,३२७
आतापर्यंत वाटलेली रक्कम - ३,४०,५३,४१२