चंद्रपूर : नैसर्गिक वायूंचे साठे समुद्रातच आढळत होते; परंतु, पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयाने केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारशा, गोंडपिपरी, राजुरा, कोरपना, भद्रावती व वरोरा तालुक्यांतील भूगर्भात ३३१ वर्ग कि.मी. भूभागात ३७, तर गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा ब्लॉकमध्ये ७०९ कि.मी. परिसरात ४७ बिलियन क्युबिक मीटर एवढे कोल बेडेड मिथेनचे साठे सापडल्याचा दावा चंद्रपूरचे खनिज अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी केला आहे.
विदर्भ व तेलंगणा राज्यात प्राणहिता-गोदावरी हे स्तरित खडकाचे संपूर्ण बेसिन ३० हजार वर्ग/कि.मी.च्या अधिक परिसरात व्यापले आहे. त्याची लांबी ४००, तर रुंदी १०० कि.मी. असून, या भूभागात भूपट्टीयदृष्ट्या नागपूर, चंद्रपूर, सिरोंचा ते तेलंगणामधील अस्वरापेटा हे चार भाग पाडण्यात आले आहेत. मात्र, महाराष्ट्रात व्यावसायिकदृष्ट्या दोन व तेलंगणात तीन ब्लॉक्स पाडण्यात आले. विदर्भात कोल बेडेड मिथेनचे ८४ बिलियन क्युबिक मीटर इतके साठे आढळले.
नागपूर ब्लॉकमध्ये अल्प साठे असले, तरी व्यावसायिकदृष्ट्या त्याला अजून मान्यता मिळालेली नाही. चंद्रपूर ब्लॉक हा ३३१ वर्ग कि.मी. भूभागाचा असून, त्यात ३७ बिलियन क्युबिक मीटर एवढे साठे आहेत. सिरोंचा ब्लॉक हा भूभागाने मोठा असून, तो ७०९ कि.मी. परिसरात व्यापला आहे. तेलंगणा राज्यात ९२३ कि.मी. भूभागात तीन ब्लॉक आहेत, अशी माहिती चोपणे यांनी दिली.