विसापूर : बल्लारपूर तालुक्यात विसापूर सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. येथील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित परिवर्तन ग्रामविकास आघाडीने ९ जागांवर विजय मिळवून बहुमत प्राप्त केले आहे. कॉंग्रेस व शिवसेना आघाडीला प्रत्येकी २ जागांवर विजय संपादन करता आला. भाजपाप्रणीत आघाडीला ३ जागांवर समाधान मानावे लागले असून एका जागी अपक्ष उमेदवार निवडून आला.
बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात मोठ्या ग्रामपंचायतीवर सतत दोनदा काँग्रेसची सत्ता होती. आता वंचित बहुजन आघाडीची सत्ता स्थापन होणार. या सगळ्या समीकरणांमध्ये आघाड्या बदलल्या तरी नेता तोच; त्याच्याच अवतीभवती गावाचे राजकारण फिरत आहे. हा गावात चर्चेचा विषय झालेला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ टोंगे यांनी यापूर्वी काँग्रेस समर्थित आघाड्या बनवून ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसची सत्ता स्थापन केली. आतासुद्धा वंचितला सोबत घेऊन माजी पंचायत समिती उपसभापती अनेकश्वर मेश्राम, राजेश गावंडे व रमेश लिंगमपल्लीवार यांच्या सहकार्याने वंचित परिवर्तन ग्राम विकास आघाडीची माेट बांधून ग्रामपंचायत निवडणूक लढवली. यामध्येही त्यांना मोठे यश आले असून १७ पैकी ९ जागा निवडून आणून निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले.
विसापूर ग्रामपंचायत प्रभाग क्रमांक १ मधून वंचित परिवर्तन ग्राम विकास आघाडीचे सुरज टाेमटे, शारदा डाहुले, रीना कांबळे यांनी बाजी मारली आहे. या प्रभागात माजी सरपंच बंडू गिरडकर यांना पराभवाला सामाेरे जावे लागले. हा गावातला सगळ्यात मोठा उलटफेर मानल्या जात आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये वंचित परिवर्तन ग्राम विकास आघाडीच्या वैशाली पुणेकर, हर्षला रवींद्र टाेंगे व अपक्ष उमेदवार गजानन पाटणकर निवडून आले. प्रभाग क्रमांक ३ मधून कॉंग्रेस प्रणीत आघाडीचे माजी उपसरपंच सुनील राेंगे तर वंचित परिवर्तन ग्राम विकास आघाडीच्या वर्षा मच्छिंद्र कुळमेथे यांनी बाजी मारली आहे. प्रभाग क्रमांक ४ मध्ये भाजपा आघाडीच्या सुरेखा इटनकर, काँग्रेस आघाडीचे नव्या दमाचे दिलदार जयकर, शिवसेना आघाडीचे प्रदीप गेडाम यांनी विजय मिळविला आहे. या प्रभागात माजी सरपंच भारत जिवने व वंचित परिवर्तन ग्राम विकास आघाडीचे नेतृत्व करणारे रमेश लिंगमपल्लीवार यांना पराभव सहन करावा लागला आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये वंचित परिवर्तन ग्राम विकास आघाडीचे नेतृत्व करणारे अनेकश्वर मेश्राम यांनी अटीतटीच्या लढतीत बाजी मारली आहे. ग्रामपंचायत सदस्य शशिकला जीवने या वंचित परिवर्तन ग्राम विकास आघाडीच्या पूनम जाधव यांचा पराभव करून विजयी झाल्या. या प्रभागात भाजपा आघाडीच्या विद्या देवाळकर यांनी वंचित परिवर्तन ग्राम विकास आघाडीच्या विद्या घाेगरे यांच्यावर केवळ ७ मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधून वंचित परिवर्तन ग्राम विकास आघाडीचे संदीप काकडे, सराेज केकती व भाजपा आघाडीच्या सुवर्णा महेंद्र कुसराम यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली आहे.
बॉक्स
२०८ मतदारांची नाेटाला पसंती
विसापूर ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत ८,२०६ मतदारांपैकी ५,७१८ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ६९.६८ इतकी आहे. मतदान प्रक्रिया दरम्यान येथील २०८ मतदारांनी नाेटाला पसंती दर्शवली.