जिवती : तालुक्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थी शिक्षणाचे बळी ठरले आहेत. ना पाटी, ना पुस्तक यामुळे आद्याक्षरे विसरलेले विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून कोसोदूर असल्याचे चित्र जिवती तालुक्यात दिसून येत आहे.
तालुक्यामध्ये शासकीय व अनुदानित आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये शासकीय आश्रमशाळेत प्राथमिक आश्रम शाळा एक, माध्यमिक आश्रमशाळा आठ, तर उच्च माध्यमिक आश्रमशाळा एक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असून, अनुदानित आश्रमशाळेमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. मार्च २०२० पासून या आश्रमशाळा बंद आहेत. आश्रमशाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. गरीब परिस्थितीतील व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील या विद्यार्थाकडे प्रशासनाने म्हणावे तसे लक्ष दिले नाही. घरी गेल्यानंतर या विद्यार्थ्यांनी शेतातील कामे, रोजंदारी, मजूर आदी मार्ग वापरला आहे. शिक्षणाच्या प्रवाहात आलेली ही मुले गावाकडे गेल्यानंतर शिक्षणातील आध्याक्षरे विसरली आहेत. या मुलांना शाळेत भोजन मिळायचे, तेदेखील बंद झाले आहे. इतर शाळांमध्ये भोजनासाठी तांदूळ, डाळी व पौष्टिक अन्न मिळत होते, अशा पद्धतीच्या कोणत्याही सुविधा या विद्यार्थ्यांना नाहीत. परिणामी पोटाची खळगी भरण्यासाठी हे विद्यार्थी गावाकडे गेल्यानंतर मजुरीच्या कामाकडे वळले. यावेळी कोणी ऊसतोडीला गेले, तर कोणी मोलमजुरी करू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. एकीकडे शिक्षणाच्या प्रगतीकडे वाटचाल करीत असताना ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शहरी भागांमध्ये विद्यार्थी इंटरनेटने जोडले. परंतु, ग्रामीण भागातील हे विद्यार्थी ज्यांनी आद्याक्षरांची पुरेशी ओळखी नाही, त्यांना इंटरनेट काय असते, याबाबतची संकल्पना ही परिपूर्ण माहीत नाही. या विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे वाटोळे झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
260721\1412-img-20210726-wa0005.jpg
शाळा सुरू होण्याचा प्रतीक्षेत विद्यार्थी.