राजेश भोजेकर/चंद्रपूर : बहुजन समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम या देशात कोणी करीत असेल तर ते भारतीय जनता पक्षच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये ओबीसी नेते केवळ चेहरे दाखविण्यासाठीच हवे आहे. पदे देताना कधीही ओबीसींचा विचार हाेत नाही, अशी बोचरी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे भाजप पक्ष प्रवेश सोहळ्यात बोलताना केली. ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे यांनी भाजपात प्रवेश केला. यापुढे भारतीय जनता पक्ष जीवतोडे यांच्या माध्यमातून ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी संपूर्ण ताकद उभी करणार, असा शब्दही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिला.
विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जीवतोडे यांनी जनता महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भव्य सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश केला. यावेळी ना. फडणवीस बोलत होते.
याप्रसंगी व्यासपिठावर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, चिमूरचे आमदार बंटी भांगडिया, आमदार परिणय फुके, वणीचे आमदार संजीवरेड्डी बाेटकुलवार, आर्णीचे आमदार डाॅ. संदीप धुर्वे, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, माजी आमदार ॲड. संजय धोटे, अतुल देशकर, सुदर्शन निमकर व आशिष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यासह चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष प्रतीभा जिवतोडे, उपाध्यक्ष अंबर जीवतोडे, रोहिणी जीवतोडे आदी मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
विदर्भ, ओबीसी व बहुजनांचा विकास हेच अंतिम ध्येय - डाॅ. अशोक जिवताेडेभाजपात प्रवेश केल्यानंतर विदर्भवादी ओबीसी नेते डाॅ. अशोक जिवतोडे म्हणाले, चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्रीहरी जीवतोडे गुरुजी यांनी पूर्व विदर्भात शिक्षणाची क्रांती घडवून आणली. सोबतच बहुजनांसाठी लढा उभा केला. हाच धागा पकडून विदर्भ, ओबीसी आणि बहुजनांचा विकास व्हावा हेच आपले अंतिम ध्येय आहे. राष्ट्रवादी पक्षात असताना ओबीसींना न्याय देता येत नव्हता. भारत स्वातंत्र्य झाल्यापासून ओबीसींच्या बाबतीत जे २२ निर्णय झाले. त्यातील तब्बल १६ निर्णय हे राज्यात देवेंद्र फडणवीस आणि देशात नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात झाले. ओबीसींना न्याय देण्याचे काम केवळ भाजपच करू शकते. याची पूर्ण खात्री असल्यानेच आपण भाजपात प्रवेश केल्याचेही डाॅ. जीवतोडे यांनी यावेळी स्पष्ट केले.