चंद्रपूर : येथील जगन्नाथ बाबा मठासमोरील दारू दुकानाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. दुकानाच्या उद्घाटनाच्या दिवशी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी हे दुकान बंद करून स्थलांतरण करण्याच्या मागणीसाठी दुकानासमोरच सत्याग्रह आंदोलन सुरु केले होते. दरम्यान, उपमहापौर राहुल पावडे यांनीसुद्धा जगन्नाथबाबा नगर दारूबंदी संयुक्त संघर्ष समितीची स्थापना करून आंदोलन सुरू केले आहे. दोघांचीही मागणी लोकहितांचीच आहे; परंतु दोघांनी वेगवेगळे पेंढाल टाकून हे आंदोलन सुरू केल्याने उपमहापौर व नगरसेवक आमने-सामने आल्याचे चित्र आहे.
दाताळा रोड मार्गावर नव्याने सुरू होणाऱ्या दारू दुकानाजवळच जगन्नाथबाबा मठ आहे. हे मठ अनेकांचे श्रद्धास्थान आहे. यासोबतच या परिसरात विविध शाळा-महाविद्यालये आहेत. त्यामुळे दारू दुकान सुरू झाल्यास विद्यार्थ्यांवर विपरित परिणाम पडतील. परिसरातील शांतता भंग होईल, या अनुषंगाने नागरिकांकडून या देशी दारू दुकानाला विरोध होत आहे. १७ एप्रिल रोजी या दुकानाच्या उद्घाटनाच्या दिवशीच जनविकास सेनेने आंदोलन करुन दारू दुकान बंद पाडले.
१८ एप्रिलपासून सत्याग्रह आंदोलन सुरू केले. त्यानंतर महिलांनी भजन आंदोलन करीत पाच हजार पत्रे जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्याचे अनोखे आंदोलन सुरू केले. तर दुसरीकडे मनपाचे उपमहापौर राहुल पावडे यांनी १८ एप्रिलला जगन्नाथ बाबा नगर संयुक्त दारूबंदी समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाला नागरिकांच्या संयुक्त हस्ताक्षराचे निवेदन दिले.
२० एप्रिलला जगन्नाथबाबा मठात जगन्नाथबाबा नगर दारूबंदी संघर्ष समिती गठित करून एल्गार पुकारला. आता पत्र भेजो, जनमत चाचणी, मोर्चा व निदर्शने करण्यात येणार असून, ‘डोअर टू डोअर’ जनजागृती सुरू केली आहे. दोघांनीही एकाच विषयासाठी वेगवेगळे पेंढाल टाकून आंदोलन सुरू केल्याने दारू दुकानाचा मुद्दा शहरात चर्चेचा विषय बनला आहे.
मनपा म्हणाले, दारू दुकानाशी संबंध नाही रे बाबा
शहरातील दाताळा रोडवरील जगन्नाथ मंदिराजवळ नवीन दारूच्या दुकानाला चंद्रपूर महानगरपालिकेकडून परवानगी दिली गेला असल्याचा अपप्रचार केला जात आहे. वास्तविक, चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत कोणत्याही व्यक्तीला दारूचे दुकान सुरू करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागामार्फत परवाना दिला जातो. याबाबतीत महानगरपालिकेकडून परवानगीची आवश्यकता नसते. तरीसुद्धा परवानगीसंदर्भातील विषयात मनपाचे नाव घेऊन नागरिकांत अविश्वासाचे वातावरण निर्माण केल्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, या विषयात मनपाचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण मनपाने दिले आहे.
दारू दुकानाचा मनपाशी संबंध आहेच : देशमुख
मनपाने दारू दुकानाच्या परवानगीशी मनपाचा संबंधच नसतो, असे हास्यास्पद स्पष्टीकरण मनपाने दिले. मात्र, दारू दुकान परवानगीशी मनपाचा कसा संबंध असतो, याबाबत आपण लवकरच पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे जनविकास सेनेचे नगरसेवक पप्पू देशमुख यांनी प्रसिद्धीपत्रकातून कळविले आहे.