चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ५०० कंत्राटी कामगारांना मागील सात महिने महिन्यांपासून वेतन न मिळाल्याने, जन विकास कामगार संघाच्या नेतृत्वात सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुला-बाळांसह डेरा आंदोलन सुरू केले.
चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुमारे ५०० कंत्राटी कामगार कार्यरत आहेत. कोरोना संसर्गाचा उद्रेक झाल्यापासून हे कामगार अविरत सेवा देत आहेत. मात्र, सात महिन्यांपासून वेतन मिळाले नाही, असा कामगारांचा आरोप आहे. याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही दुर्लक्ष केल्याने डेरा आंदोलनाचे पाऊल उचलल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. जोपर्यंत बँक खात्यात पगार जमा होत नाही व किमान वेतन वेतन लागू होणार नाही, तोपर्यंत कुटुंबीयांसह जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच डेरा आंदोलन सुरू ठेऊ, असा इशारा कामगारांनी दिला आहे. विशेष म्हणजे, कामगार स्वतः आंदोलनस्थळी भोजन तयार करणार आहेत. दिवसरात्र तिथेच मुक्काम करणार असल्याची माहिती जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिली. आंदोलनात राहुल दडमल, सतीश येसांबरे, ज्योती कांबळे, अमोल घोडमारे, सतीश घोडमारे, कांचन चिंचेकर, नीलिमा वनकर, राकेश मस्कावार, सुनिता रामटेके, शेवंता भालेराव, सीमा वासमवार, रमा अलोणे, निशा साव, रवी काळे, अंकित वाघमारे, विक्की दास, किशोर रोहणकर, सुहास पानबुडे, सागर धामनगे, भोजराज अंडेलवार व बहुसंख्य महिला सहभागी झाल्या आहेत.
कामगारांकडून श्रद्धांजली अर्पण
वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.अरुण हुमणे यांच्या मातेचे आज निधन झाल्याची माहिती मिळताच, सर्व कामगारांनी आंदोलनस्थळी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण केली. यापूर्वीचे अधिष्ठाता डॉ.एस.एस. मोरे यांची भ्रष्ट कार्यप्रणाली व विद्यमान अधिष्ठाता डॉ.हुमणे यांच्या अकार्यक्षमतेमुळे कामगारांचे वेतन थकीत आहे. त्यामुळे उपासमारीची वेळ आली, असा आरोप कामगारांनी केला आहे.