बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव येथील शेतकरी विशाल उपरे यांनी आपल्या शेतात दोन एकरमध्ये कापसाची लागवड केली होती. सुरुवातीला पीक चांगले असल्याने यंदा चांगले उत्पन्न होईल, अशी आशा उपरे यांना होती. ऐन कापूस वेचणीला आला असता गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. कापसाचे बोंड सडले. परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान केल्यानंतर हाती येणारे पीक डोळ्यादेखत गुलाबी बोंड अळीमुळे उद्ध्वस्त होत आहे. हे पाहून शेतकऱ्याने कापसाचे पीकच ट्रॅक्टरच्या साहाय्याने काढून टाकले. यामध्ये मोठे नुकसान झाले असून कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोट
शेतात दोन एकरमध्ये कपाशीची लागवड केली होती. सुरूवातीपासून पिकांवर अतोनात खर्च केला. मात्र कापसावर अचानक गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याने दोन एकरातील कापसाच्या पिकावर ट्रॅक्टर फिरवून पीक काढून टाकले. यात मोठे नुकसान झाले असून केलेला खर्च वाया गेला आहे.
- विशाल उपरे पळसगाव ता. बल्लारपूर