देवाडा : राजुरा तालुक्यातील पेसा आदिवासी ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवाडा येथे ३३ केव्हीचे केंद्र असूनही नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे. यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मागील वर्षापासून ३३ केव्ही केंद्र सुरू असून देवाडावासीयांना याचा लाभ होताना दिसून येत नाही. पूर्वी तरी वीजपुरवठा सुरळीत सुरू होता. ३३ केव्ही सुरू झाल्यापासून देवाड्यातील गावकऱ्यांना अंधारात राहावे लागत आहे. तसेच परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. देवाडा येथूनच सुकडपल्ली, सोंडो, वरूर रोड, तुलना, राणवेली, भेदोडा, साखरवाही, भुरकुंडा, आदी परिसरातील गावांना विद्युत पुरवठा केला जातो. या परिसरात विद्युत पुरवठा २४ तास सुरळीत सुरू राहावा, यासाठी अभियंता, उपअभियंता आहे. कर्मचारी, शिवाय खाजगी ठेकेदाराची माणसे दिमतीला आहेत. तरीही उन्हाळ्यात वाकलेले इलेक्ट्रिक पोल दुरुस्त करणे, लोंबकळलेल्या विद्युत वाहक तारांच्या संपर्कात येणारी झाडे, फांद्या तोडणे व अशी अनेक कामे करणे अपेक्षित असताना ते होताना दिसत नाही. थोडाही पाऊस झाला की कुठेतरी विद्युत तारांना झाडाचा स्पर्श होऊन वीज खंडित होते. त्यानंतर देवाडा परिसरातील विद्युत ग्राहकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागते. याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.