लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदमधील वर्ग-३ च्या नोकरीसाठी तत्कालीन जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत बनावट स्वाक्षरी वापरून २२ ते २५ बेरोजगारांना लाखोेंनी गंडविल्याची खळबळजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणाबाबत जि. प. प्रशासन बुधवारी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे. कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. मिळेल ते काम युवक करण्यासाठी तयार होत आहेत. अशातच बल्लारपूरच्या एका व्यक्तीने काही युवकांना आपल्या जाळ्यात ओढून जिल्हा परिषदेतील कनिष्ठ साहायक व परिचराच्या नोकरीचे बनावट आदेश दिले. जिल्हा परिषदेत कोणतीही भरती प्रक्रिया राबविली नसताना २०१९-२० या आर्थिक वर्षात तत्कालीन जिल्हाधिकारी आणि तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत स्वाक्षरी चोरून हे आदेश तयार केल्याचे समजते. सोमवारी दोन ते तीन युवकांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट घेऊन बनावट आदेश दाखविल्यानंतर त्यांनाही धक्काच बसला. बनावट आदेश देऊन फसवणूक झालेले आणखी २० ते २२ युवक असल्याची माहिती त्या युवकांनीच सीईओंना देत बल्लारपुरातील एका व्यक्तीने हा गोरखधंदा केल्याचेही सांगितले. संबंधित जिल्हा परिषदचे अधिकारी मंगळवारी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले होते. परंतु, पोलिसांनी मूळ कागदपत्र मागितल्याने बुधवारी तक्रार केली जाणार आहे. असे प्रकार घडू नये, यासाठी अधिकाऱ्यांना सूचना जारी केल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेठी यांनी दिली.
सोमवारी काही युवकांनी मला नोकरीचे आदेश दाखविले. परंतु, ते पूर्णपणे बनावट असल्याने पोलिसात तक्रार देण्याच्या सूचना केल्या आहेत. पोलीस अधीक्षकांशीही याबाबत चर्चा झाली आहे. - डॉ. मित्ताली सेठी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर.
नोकरीच्या बनावट स्वाक्षरीबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि वकिलांचा सल्ला घेऊन बुधवारी तक्रार दाखल करण्यात येईल. युवकांनी दिलेल्या तक्रारीसोबत प्राप्त झालेल्या बनावट आदेशावर तत्कालीन जिल्हाधिकारी व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची संगणकीकृत स्वाक्षरी स्कॅन करून टाकण्यात आली आहे.- श्याम वाखर्डे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. चंद्रपूर.
बल्लारपु्रातील ‘तो’ व्यक्ती कोण ?- जिल्ह्यातील २० ते २२ युवक बल्लारपुरातील एका व्यक्तीच्या जाळ्यात फसले. प्रत्येकाकडून त्याने ७ ते १५ लाखापर्यंतची रक्कम वसूल केली. २०१९-२० या वर्षात हे बनावट आदेश दिल्यानंतर एक वर्ष काही युवकांनी नोकरीची वाट बघितली. हाती काहीच न आल्याने अधिक चौकशीसाठी जिल्हा परिषदेचे कार्यालय गाठले असता नोकरीचा आदेशच बनावट असल्याचे सिद्ध झाले. फसगत झालेल्या युवकांनी बल्लारपुरातील व्यक्तीचे नाव सांगितल्याने नोकरीच्या नावावर गंडविणारी टोळी जिल्ह्यात सक्रीय असण्याची शक्यता आहे.- राज्य शासनाने आरोग्य विभागातील गट ड पदासाठी पात्र उमेदवारांकडून काही दिवसांपूर्वीच अर्ज मागविले. या पदभरतीची प्रक्रीया अद्याप सुरू झाली नाही. या पदांसाठीही बेरोजगार युवक-युवतीकडूंन नोकरीच्या नावावर फसवणूक होऊ शकते. त्यामुळे अशा भामट्यांपासून उमेदवारांनी सावध राहण्याचे आवाहन जि.प. सीईओ डाॅ. मित्ताली सेठी यांनी केले.