३० बँकाचा सहभाग : ५५०० कर्मचाऱ्यांनी केला संप चंद्रपुर : युनाईटेड फोरम आॅफ बँक युनियनच्या माध्यमातून जिल्ह्यातील संपूर्ण राष्ट्रीयकृत बॅकांनी शुक्रवारी एक दिवसाचा बंद केला. या संपात चंद्रपूर जिल्ह्यातील ३० बँकेचे ५ हजार ५०० कर्मचारी सहभागी झाले होते. त्यामुळे शुक्रवारी ग्राहकांची चांगलीच पंचाईत होताना दिसून आली.कर्मचाऱ्यांच्या संपामुळे करोडोंचा व्यवहार ठप्प झाला. तर सहकारी बँका सुरु होत्या. शनिवारी सर्व बँका पुर्ववत सुरु होणार आहेत. बँक युनियन संघटनेच्या युनाईटेड फोरमच्या मागण्या सरकारने पूर्ण न केल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी एक दिवसाच्या संपाची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार चंद्रपूर शहरात हा बंद शंभर टक्के यशस्वी झाला. शहरातील सर्व बँक बंद होत्या. यात चंद्रपूर शहरातील ३ हजार व जिल्ह्यातील ५ हजार ५०० बँक कर्मचारी सहभागी झाले होते. शहरतील सर्व कर्मचारी सकाळी ११ वाजता स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर एकत्रित आले. त्यानंतर नारेबाजी करुन प्रदर्शन केले. यावेळी सुरेश डुमडे, योगेश धकाते, सुधीर टिकेकर, किशोर जामदार, किशोर सिध्दांती आदी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. (नगर प्रतिनिधी)
बँक कर्मचाऱ्यांच्या संपाने ग्राहकांची पंचाईत
By admin | Published: July 30, 2016 12:45 AM