लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ब्रह्मपुरी क्षेत्रातील २६ गावे जंगल परिसराला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण झालेला होता. या परिसरातील अनेक गावांमध्ये वाघाने हल्ला केल्यामुळे गेल्या चार महिन्यांत पाच जणांचा बळी गेला. अनेक जण गंभीर जखमी झाले होते. या परिसरात नरभक्षक वाघामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. या क्षेत्रातील आमदार विजय वडेट्टीवार यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना भेटून या संदर्भात निवेदन दिले असता वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्या दालनात नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेनुसार वन्यप्राण्यांपासून धोका असलेल्या ब्रह्मपुरी क्षेत्रातील २६ गावात लोकोपयोगी कामांना मंजुरी देण्यात आलेली आहे, अशी माहिती ब्रह्मपुरीचे आ. वडेट्टीवार यांनी दिली.वन विभागाचे सचिव यांच्या दालनात झालेल्या बैठकीत विधीमंडळाचे उपगटनेता आ. विजय वडेट्टीवार, विकास खारगे, अशोक रामटेके, दोडल हे उपस्थित होते. तर चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक शेळके आणि ब्रह्मपुरीचे उपविभागीय वनसंरक्षक सिंग हे व्हिडीयो कॉन्फरसींगच्या माध्यमात चंद्रपूरवरून उपलब्ध होते.यावेळी धामनगाव, वायगाव, धुलेगाव, रामपुरी, नवेगाव, बेलगाव, मुरपार, गायडोंगरी, परसोडी, खिलारी, खंडाळा, गडमोशी, पवनपार, टेकरी तुकूम, सामदा खुर्द, रत्नापूर, भुज, पदमापूर, हळदा, बोळधा, वांद्रा, कोसंबी, किटाळी, सिंदेवाही रान या २६ गावांमध्ये जवळपास ५२०० ते ५५०० कुटुंब राहत आहेत.या सर्व कुटुंबाना एलपीजी गॅस वनविभागाच्या वतीने तातडीने देण्यात येतील. वन्यप्राण्यांपासून शेतातील पिकांचे संरक्षण होण्याकरिता वनविभागाच्या श्यामाप्रसाद मुखर्जी योजने अंतर्गत जंगलाला लागून असलेल्या शेताला जाळी असलेल्या तारेचे फेन्सिंग करण्यात येणार आहे.या २६ गावांमध्ये मुख्य रस्त्यावर आणि जंगलाच्या सीमेवर एलएएडी सोलर लाईट लावण्यात येणार आहे. तसेच या २६ गावांच्या जवळ असलेल्या जंगलाच्या सीमेवर सहा फुट उंचीचे आणि किमान दोन किमी लांब जाळी असलेल्या जवळपास ५० ते ६० किमी अंतराचे तारेचे चेनिंग फेसिंग करण्यात येणार आहे.या तारेच्या कंपाऊडला लागूनच जंगलाच्या आतील भागात घनदाट बांबुचे रोपवन करण्यात येणार आहे. जेणेकरून वन्यप्राणी गावात येणार नाही, तसेच शेतीचे नुकसानही करणार नाही.या सर्व कामाचे तातडीने सर्व्हेक्षण करून प्रस्ताव सादर करावे, असे निर्देश वन सचिव विकास खारगे यांनी मुख्य वनसंरक्षक शेळके यांना दिले आहे. लवकरच या कामांना निधीसह मंजुरी मिळणार असल्याने येत्या आॅक्टोबर महिन्यापासून सदर कामास सुरुवातही होणार आहे, अशी माहिती आ. वडेट्टीवार यांनी दिली.
जंगलव्याप्त २६ गावांमध्ये विकास होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:53 PM
ब्रह्मपुरी क्षेत्रातील २६ गावे जंगल परिसराला लागून असल्यामुळे वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण झालेला होता.
ठळक मुद्देविजय वडेट्टीवार : ब्रह्मपुरी क्षेत्रातील वन्यप्राण्यांमुळे त्रस्त गावे