बीएसएनएल कार्यालयातील रिक्त पदे भरा
चंद्रपूर : जिल्ह्यातील अनेक दूरभाष केंद्रातील प्रमुख अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. त्यामुळे येथील कारभार रामभरोसे सुरु आहे. बऱ्याच ठिकाणी अनेक तांत्रिक अडचणी आहे. यामुळे त्या सोडवण्यासाठी रिक्त पदे भराव्या,अशी मागणी केली जात आहे.
रस्त्यावर रिफ्लेक्टर लावा
जिवती : तालुक्यातील गडचंदुर , पाटण, जिवती , गडचांदूर, नगराळा, जिवती , टेकामांडवा, भारी, येल्लापूर , धनकदेवी वर्दळीच्या रस्त्यावर रिफ्लेक्टर लावण्यात यावे, अशी मागणी वाहतूकदारांकडून होत आहे. या मार्गावर रिफ्लेक्टर लावल्यास रात्रीच्या प्रवासातील अडचण दूर होईल. यामुळे अपघातांना आळा बसेल. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
-
जीर्ण इमारतींची पुनर्बांधणी करावी
ब्रह्मपुरी : उपविभागीय स्थान असलेल्या ब्रह्मपुरी शहरात अनेक जीर्ण शासकीय निमशासकीय कार्यालये, कर्मचारी सदनिका आहे. या इमारतीची पुनर्बांधणी करून सुसज्ज बनवण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
किरमिटी मेंढा येथे रेल्वे स्थानकाची बांधणी करा
नांगभिड : गोंदिया-बल्लारशा रेल्वेमार्गावरील किरमिटी मेंढा येथील रेल्वे स्थानकावर वास्तू व प्लॅटफॉर्मचे बांधकाम करण्यात आले नाही. त्यामुळे रस्त्यावरूनच नागरिकांना रेल्वे पकडावी लागत आहे. यात अनेक गैरसोयीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे. त्यामुळे याठिकाणी सुसज्ज स्थानक बांधावे, अशी मागणी केली जात आहे.
महालक्ष्मी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्या
सिंदेवाही : येथे नागपूर - चंद्रपूर मार्गावर महालक्ष्मी मंदिर आहे. याठिकाणी दररोज भाविकांची मोठी गर्दी असते. सदर परिसर ही निसर्गरम्य आहे. त्यामुळे या स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विकास साधावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
सावली ते चिमूर बसफेऱ्या वाढवाव्या.
सावली : येथून सिंदेवाही मार्गे चिमूरसाठी बस फेऱ्या वाढविण्यात याव्या, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. या मार्गावर बस फेऱ्या वाढल्यास परिसरातील नवरगाव, रत्नापूर, पाथरी, लोनवाही आदी गावांसाठी सोयीचे होईल. तसेच प्रवाशांची होणारी अडचण दूर होईल. याकडे राज्य परिवहन महामंडळने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
वनराजिक महाविद्यालयाची स्थापना करा
चिमूर : तालुक्याचे स्थान असलेल्या चिमूर येथे वनराजिक महाविद्यालयाची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे. याठिकाणी सदर महाविद्यालय स्थापन झाल्यास येथील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी इतरत्र जावे लागणार नाही. तसेच वन अभ्यासक्रमाशी आधारित शिक्षण घेता येईल.