लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बारावी परीक्षेचा निकाल बुधवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९६.१० टक्के लागला. ब्रह्मपुरी येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील विकास सीताराम परतानी हा वाणिज्य शाखेचा (इंग्रजी माध्यम) विद्यार्थी ९५. ८३ टक्के घेऊन जिल्ह्यात प्रथम आला. त्यापाठोपाठ वरोरा येथील दिशा ज्युनिअर कॉलेज विज्ञान शाखेची मृणाल उमेश लाभे ही ९५. ६७ टक्के गुण घेत द्वितीय आली. तर नेवजाबाई हितकारिणी ज्यु. कॉलेजची सलोनी पिलारे ही ९१.५० टक्के घेऊन तिसरी आली आहे. यंदाच्या निकालात चंद्रपूर तालुका (९७. ८३ टक्के) अव्वल ठरला, तर सिंदेवाही तालुका (९२.५५ टक्के) पिछाडीवर गेला. नागपूर विभागातील निकालात चंद्रपूर जिल्हा चवथ्या क्रमांकावर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून एकूण २८ हजार ३५८ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील २८ हजार १४५ विद्यार्थी परीक्षेला बसले. यामधील २७ हजार ५१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकूण दोन हजार ९७६ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य प्राप्त केले आहे. १० हजार ६२८ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. १२ हजार १०२ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. नागपूर विभागातून बारावीच्या निकालात चंद्रपूर जिल्हा चवथ्या क्रमांकावर आहे. मागील वर्षी चंद्रपूर जिल्हा विदर्भात पाचव्या क्रमांकावर होता. (तालुकानिहाय निकाल पान २ वर)
वाणिज्य शाखा ९४. ६६ टक्केवाणिज्य शाखेतून एकूण दोन हजार १०१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक हजार ८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. वाणिज्य शाखेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांची टक्केवारी ९४.६६ आहे. गतवर्षीच्या तुलनेत वाणिज्य शाखेचा निकाल ५ टक्क्यांनी वाढला आहे.
कला शाखा ९३. ६७ टक्केकला शाखेतून एकूण १३ हजार १४२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १२ हजार ३११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कला शाखेची टक्केवारी ९३.६७ आहे. कला शाखेसाठी १३ हजार २७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षा देणाऱ्यांचे प्रमाण वाढले. गतवर्षी कोरोनामुळे १६ टक्के परीक्षेला बसले नव्हते. गतवर्षी निकाल ५ टक्क्यांनी कमी होता.
एमसीव्हीसी ९६.१७ टक्के एमसीव्हीसी (व्होकेशनल) अभ्यास शाखेतून एक हजार ४९२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यापैकी एक हजार ४३५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. या शाखेची टक्केवारी ९६.१७ इतकी आहे.
ग्रामीण विद्यार्थ्यांची आघाडीजिल्ह्यातील सर्व तालुक्याचा निकाल बघता ग्रामीण विद्यार्थ्यांनी निकालात आपली चुणूक दाखवून शहरी विद्यार्थ्यांवर मात केल्याचे दिसून येते जिवती, गोंडपिपरी, कोरपना, सावली, मूल, नागभीड, पोंभुर्णा या तालुक्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांनी चांगला निकाल दिला आहे.