मनोज गोरे/जयंत जेनेकर कोरपनाजम्मू कश्मीरमधील उरी येथे रविवारी पहाटे भारतीय जवानांच्या कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात १८ जवान शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्रातील चार जणांचा समावेश होता. यातील यवतमाळ जिल्ह्यातील मुरड (नेरड) येथील विकास जनार्दन कुडमेथे हा जवान जखमी झाला. त्याचा दिल्ली येथील रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची वार्ता कळताच कोरपन्यात एकच शोककळा पसरली.पुरड (नेरड) येथील मूळ निवासी असलेल्या विकासचे कोरपन्याशी जिव्हाळ्याचे नाते होते. माध्यमिक शिक्षणानंतर घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने कोरपना येथील अमोल ढवस यांच्या वेल्डींग वर्कशॉप मध्ये त्याने रोजंदारीवर काम स्वीकारले. त्यानंतर २००८ ला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कोरपना येथे वायरमन ट्रेडला प्रवेश घेऊन वसतिगृहात राहून शिक्षण पूर्ण केले. याच दरम्यान सुट्टीच्या दिवसात त्याने वेल्डींग वर्कशॉपवरचे काम सुरू ठेवले. याचबरोबर अभ्यासक्रमात अत्यंत तल्लक्ष व हुशार असल्याने त्याने स्पर्धा परीक्षेचीही तयारी सुरू केली. रोज पहाटे ४ वाजता उठून नियमित व्यायाम, पोलीस व सैन्य भरतीसाठी आवश्यक ती पूर्ण तयारी त्यांनी यावेळी केल्याचे त्याचे जिवलग मित्र प्रदीप कोल्हे, अमोल आसेकर, गजानन बेलकुडे यांनी सांगितले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये व्यवसाय प्रशिक्षणाचे धडे गिरवतानाच त्याने सैन्य भरतीसाठी अर्ज केला. त्यात तो पात्र होऊन २००९ मध्ये सैन्यात दाखल झाला. यात त्यासोबत प्रकाश किन्नाके या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत फिटर ट्रेडमधील मित्राचा समावेश होता. दोघांचीही पहिली पोस्टींग आराम येथे झाली. त्यानंतर ते जम्मू कश्मीर बटालियनमध्ये दाखल झाले. या सैन्य भरतीसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे तत्कालिन प्राचार्य भालचंद्र रासेकर, आर.बी. तावाडे, वसतिगृह अधीक्षक लोखंडे यांनी मोलाचे मार्गदर्शन करून करिअर संबधीेची वाट दाखविली. शांत, सुस्वभावी व मनमिळावू स्वभाव असलेल्या विकासने बाहेर गावातून येऊन सुद्धा आपल्या सवंगड्याशी चांगली मैत्री जमवली होती. यात त्याच्या जिवलग मित्रांमध्ये भारत वरारकर, निलेश केराम, किशोर कन्नाके, निलेश क्षिरसागर, हरिदास वरारकर, निलेश वाढई, धनराज देवतळे, विक्की कुळसंगे, प्रा. संजय तेलतुबंडे आदींचा समावेश होता. शरिरयष्टीने धष्टपुष्ट व कणखर असलेल्या विकासची घेतलेल्या कामाबद्दल ओढही अतिशय प्रामाणिक होती. एका दामात तीन घन मारुन १० एमएमची न तुटणारी सळाख, तो एका घनाच्या दणक्यात तोडत असल्याचे अमोल ढवस यांनी सांगितले. तो शहीद झाल्याच्या बातमीनंतर अनेकांनी साश्रू नयनांनी वाट मोकळी करून दिली.
विकासने घेतले होते कोरपन्यात व्यवसाय प्रशिक्षण
By admin | Published: September 22, 2016 12:49 AM