कामगारांची चिंता वाढली
चंद्रपूर : मागील अनेक वर्षांपासून विविध खासगी क्षेत्रात काम करूनही अत्यल्प पेन्शन मिळत असल्यामुळे कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न या कामागारांनी उपस्थित केला आहे.
अतिक्रमण हटविण्याची मागणी
चंद्रपूर : शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था योग्य ठेवण्यासाठी महापालिकेने अतक्रिमण हटाव मोहीम सुरू करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
रस्त्यांची दुरुस्ती करावी
ब्रह्मपुरी : तालुक्याला जोडणाऱ्या ग्रामीण भागातील विविध रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, लाॅकडाऊन काळामध्ये रस्त्याचे कामे बंद होती. आता काही ठिकाणी सुरू करण्यात आली आहे. मात्र, गती नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
निवाऱ्याची दुरवस्था
चंद्रपूर : चंद्रपूर-आदिलाबाद महामार्गावरील रस्त्यावर प्रवासी निवाऱ्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना झाडांचा आश्रम घ्यावा लागत आहे. या प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
कर्मचाऱ्यांना वाढीव मानधन द्या
चंद्रपूर : शासनाने विविध विभागामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. मात्र, त्यांना मानधन कमी दिले जात असल्यामुळे त्यांच्यात असंतोष पसरला आहे. या कामगारांना मानधन वाढवून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
पथदिवे बंद असल्याने नागरिकांना त्रास
चंद्रपूर : शहरातील विविध भागासह जमनजेट्टी परिसरातील पथदिवे काही दिवसांपासून बंद आहेत. या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहनधारक व नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेने या मार्गावरील पथदिवे दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये संताप
चंद्रपूर : येथील तुळशीनगरात ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्रासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे. मात्र, या जागेवर नामफलकाशिवाय काहीच नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याकडे नगरसेवकांनी लक्ष देऊन विकास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
रस्त्यावरील झुडपे जीवघेणी
कोरपना: ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा वाढलेल्या झुडपांमुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे झुडपे तोडून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, वन्यप्राण्यांमुळे अपघाताची शक्यताही आहे.
रिक्त पदांमुळे कामे खोळंबली
जिवती : येथील तहसील कार्यालयात काही पदे रिक्त आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या गतिमानतेवर परिणाम झाला. कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कार्यालयात येतात, परंतु कार्यालयातील महत्त्वाची पदे रिक्त आहेत. त्यामुळे कामे खोळंबली आहेत. रिक्त पदे भरून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.