सास्ती : नागरिकांच्या सोईसाठी व क्षेत्राच्या विकासासाठी शासनाच्या वतीने विविध विकास कामे मंजूर केली जातात. या विकास कामाचा मोठा उदो-उदो केला जातो. परंतु ग्रामीण व दुर्मिळ भागातील विविध कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. काही कामे तर अर्धवट सोडून दिल्याचेही चित्र दिसून येत आहे. यामुळे शासनाचा करोडो रुपयांचा निधी व्यर्थ जात असल्याचे चित्र राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमावर्ती भागातील जैतापूर येथील गाव तलावाच्या तसेच याच भागातील पेल्लोरा-किन्हीबोडी या रस्त्याच्या कामाकडे पाहिल्यावर दिसून येत आहे.राजुरा-कोरपना तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जैतापूर येथे जिल्हा परिषद लघुसिंचाई उपविभाग राजुरा अंतर्गत २० लाख ३९ हजार ६२ रुपयांच्या गावतलावाचे काम मंजूर करण्यात आले. मोठ्या थाटामाटात कामाचे भूमिपूजनही झाले. परंतु तलावाचे काम अगदीच निकृष्ट दर्जाच्या केल्यामुळे पहिल्याच पावसाळ्यात तलावाच्या पारीला भोके पडून व भेगा जाऊन तलावातील पाणी वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांचे सिंचनाचे स्वप्न तर भंगलेच. परंतु शासनाचा लाखो रुपयांचा निधीसुद्धा व्यर्थ गेला. याच परिसरातील पेल्लोरा ते किन्हबोडी या दीड कि.मी.च्या रस्त्याच्या मजबुतीकरणाचे २० लाखांचे काम मंजूर आहे. मात्र काम अजूनही थंडबस्त्यात आहे. रस्त्याच्या कडेवर गिट्टी-माती टाकून ठेवण्यात आली आहे. परंतु काम पूर्ण झाले नाही. जे काम केले तेही निकृष्ट दर्जाचे आहे. (वार्ताहर)
विकासकामांची बांधकामे निकृष्ट
By admin | Published: November 16, 2014 10:47 PM