नवरगाव : सिंदेवाही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीतील ८९ या आकड्याचे ग्रहण लागल्याने विकास कामांना खिळ बसली आहे. त्यामुळे लोकांमध्ये नाराजीचा सुर उमटत आहे.नवरगाव ग्रामपंचायतीमध्ये १७ सदस्यांची संख्या असून लोकसंख्या १५ हजारच्या आसपास आहे. मागील अडीच-तीन महिन्यापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक भाजपा गट, काँग्रेस गट व गोपाल चिलबुले गट अशा तीन गटामध्ये लढल्या गेली. भाजपा गटाचे नऊ उमेदवार, काँग्रेस गटाचे चार उमेदवार तर चिलबुले गटाचे चार उमेदवार निवडून आले. मात्र सरपंच-उपसरपंच पदाच्या निवडणुकीत भाजपा गटातील एक सदस्य फुटला आणि चिलबुले गटाला मिळाला. काँग्रेस व चिलबुले गट एकत्र आले. त्यामुळे भाजपा गटाकडे आठ सदस्य व विरोधी गटाकडे नऊ सदस्य झाले. सरपंच पद राखीव असल्याने आठ मधील सरपंच झाल्या. म्हणजे ८ व ९ असे ८९ तसेच सरपंच पदाची निवडणुकही ८-९-२०१५ ला झाली. सत्ताधारीकडे ८ व विरोधीगटाकडे ९ असे ८९ या आकड्याला विशेष महत्त्व आले. परंतु याच आकड्यामुळे आता विकासकामांना मोठी खिळ बसली आहे.नवरगाव ग्रामपंचायतला लाखो रुपयाचा निधी विकास कामासाठी आला आहे. पदभार स्वीकारण्याला दोन महिन्याच्या वर कालावधी झाला आहे. मात्र कोणत्याही विकास कामांना सुरुवात झालेली नाही. ग्रामपंचायत अंतर्गत ७० ते ८० टक्के रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामध्ये काही सिमेंट रस्ते आहेत. गावकऱ्यांना चालताना व वाहन चालकांनाही वाहन सांभाळून चालवावे लागत आहे. काही रस्त्यांवर गतिरोधक बनविले. मात्र ते अरुंद व जास्त उंच असल्याने वाहन चालकांचाच जीव धोक्यात आला आहे. आझाद चौक ते रत्नापूर फाटा रस्त्यावर खड्डे पडले. त्यावर मागील पाच-सहा वर्षापासून ग्रामपंचायत कडून तात्पुरता मुरुम टाकल्या जातो. पुन्हा तो रस्ता वाहतुकीमुळे तसाच होतो. बऱ्याच ठिकाणच्या नाल्या तुंबलेल्या आहेत. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून डास नष्ट करण्यासाठी फवारणीचा प्रश्न आहे. मागील एक-दीड वर्षापूर्वी नवीन कोंडवाडा बांधण्यात आला. परंतु त्याचा उपयोग होत नाही आहे.ग्रामपंचायतीकडे विकास कामासाठी ७० लाखांच्या आसपास निधी पडला असल्याची चर्चा आहे. मात्र विकास कामाचे नियोजनाची गरज आहे. मात्र सत्ताधाऱ्यांकडे आठ सदस्य व विरोधी गटाकडे नऊ सदस्य असल्याने ८९ या आकड्याचे ग्रहण नवरगाव ग्रामपंचायत लागल्याची चर्चा नागरिकांत दिसून येत आहे. त्यामुळे विकास कामांना गती देण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. (वार्ताहर)
विकास कामे ठप्प : नागरिकांत नाराजीचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2015 2:11 AM