साईनाथ कुचनकार, चंद्रपूर: दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा श्री महाकाली देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. रविवार दि. १४ एप्रिल रोजी नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनासाठी मराठवाडा, तेलंगणासह इतर परिसरातून भाविकांचे जत्थे येण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी परंपरेनुसार पहाटे सकाळी चार वाजता धार्मिक विधी सुरू झाला. श्री महाकाली मातेला दूध, दही पंचामृत जल नि अभ्यंगस्नान करून देवीला वस्त्र परिधान करण्यात आले. मातेच्या अंगावर अलंकार दागिने व मुखवटा चढवून हारफुले अर्पण करण्यात आले. त्यानंतर मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा भक्तांचे जत्थे येणे सुरू झाले आहे.
रविवारी पहाटे श्री महाकाली देवस्थान ट्रस्टचे व्यवस्थापक सुनील नामदेवराव महाकाले, क्षमा सुनील महाकाले यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्यानंतर महापूजा करण्यात आली. महाआरतीनंतर मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आले. आईचा नामघोष करीत भाविकांनी मातेचे दर्शन घेतले. परंपरेनुसार महाकाली मंदिर परिसरात हळद उधळण करीत डफचा तालावर वाजतगाजत भाविकांनी हळदीची उधळण केली. त्यानंतर श्री महाकाली मंदिरातून भक्त मंडळी श्री एकवीरा मातेच्या घटस्थापनेकरिता वाजतगाजत हळदीचे उधळण करीत मिरवणूक काढली. एकवीरा मंदिरात पोहोचताच महाकाले परिवारातील सदस्य ऋषिकेश अनिल महाकाले यांच्या हस्ते घटस्थापना व आरती करण्यात आली.
हनुमान पोर्णिमा हा महत्त्वाचा दिवस
हनुमान पौर्णिमेला महाकाली देवीची महापूजा असते. दुपारच्या आरतीनंतर घट हलविण्यात येतो. भाविक नारळ फोडून परतीचा मार्गाला लागतात व गर्दी कमी कमी होत जाते. हा सर्वात महत्त्वाचा दिवस असतो.
आधुनिक फाॅगर सिस्टिम
भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये व वातावरण थंड राखण्यासाठी आधुनिक फाॅगर सिस्टिम बसविण्यात आली आहे. दिनांक १९/०४/२०२४ पासून २४ तास महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. स्वच्छतेसाठी स्वच्छतादूताची, रांग व्यवस्थापन करिता व पाणी व्यवस्थापनकरिता रोजंदारीवर कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त १०० स्वयं सेवकांची नियुक्ती करण्यात आली आहे.