अतिरिक्त कामगार : मनपातर्फे युद्धस्तरावर सफाईचंद्रपूर : चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकालीची यात्रा झाली असून भाविक आपापल्या गावांकडे परतीच्या मार्गावर आहेत. या यात्रेनिमित्त लाखो भाविकांना मंदिरातर्फे व ठिकठिकाणी भोजनदान करण्यात येते. त्या भोजनादानाच्या पत्रावळी, द्रोण, ग्लास, वाट्या, दुकानदारांचा निघणारा कचरा, रस्त्यावर व मंदिर परिसरात शिंपडण्यात येणारा भात आदीमुळे सर्वत्र दुर्गंधी तयार झाली होती. त्याचा स्थानिक नागरिकांना भयंकर त्रास सहन करावा लागतो.या गंभीर समस्येची दखल घेत मनपा आयुक्त संजय काकडे व उपायुक्त विजय देवळीकर यांनी यात्रा परिसरात युद्ध पातळीवर सफाई करण्याचे निर्देश दिलेले असून नियमित कामगारांपेक्षा ३० अतिरिक्त कामगार लावण्यात आले.महाकाली यात्रा परिसराचे स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार यांनी याबाबत एक कृती आराखडा तयार करून १३ एप्रिलपासून महाकाली यात्रा परिसरात युद्ध पातळीवर सफाई कार्य सुरू केले. पंजाबीवाडी, गुरूद्वारा, मध्यवर्ती बँक, पदमशाली मंदिर, नागाचार्य मंदिर, चहारेवाडी, बुरडमोहल्ला, वनकर सॉ मिल, राजेश मून एरिया, जगदिश मॅच फॅक्टरी, महाकाली पोलीस चौकी, बैलबाजार, तुळजाभवानी परिसरातील नाल्या काढुन कचरा वेळीच उचलण्यात आला. सर्व ठिकाणी जंतुनाशक पावडरचा छिडकाव करून कीटकनाशक फवारणी करण्यात आली. गोळा झालेला कचरा टिप्पर जे.सी.बी. व कचरा गाड्या लावून तत्काळ उचलण्यात आला.सहायक आयुक्त व महाकाली यात्रा समन्वय अधिकारी सचिन पाटील व प्रभारी प्रभाग अधिकारी नरेंद्र बोबाटे यांच्या नियंत्रणात स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार व भूपेश गोठे, शिपाई धर्मपाल तागडे, रमेश कोकुळे, प्रल्हाद हजारे, गणेश खोटे, बंडू मून, सुधाकर चांदेकर, दशरथ चांदेकर, दखने, जवादे, कंत्राटी महेंद्र राखडे आदींनी प्रयत्न केले. (प्रतिनिधी)मतदान केंद्राची सफाईयावेळी प्रथमच महाकाली यात्रा व मनपा निवडणूक एकाचवेळी आल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यात्रा परिसरातील सफाई शिवाय प्रभागतील अवैध तोरण, बॅनर्स, झेंडे काढण्याचे कामही नित्याने सुरू असून निवडणूक केंद्र सफाई करण्याचे कामही सुरू आहे. पालिका अधिकारी निवडणूक कार्यात व्यस्त असल्याने नगर अभियंता महेश बारई व पाणीपुरवठा अभियंता अनिल घुमडे यांनी वेळोवेळी यात्रा परिसरात पाहणी केली.
महाकाली यात्रेतील भाविक परतीच्या मार्गावर
By admin | Published: April 17, 2017 12:39 AM