लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ताडोबा देवाच्या पूजा-अर्चेसाठी व देवदर्शनासाठी भाविकांना ताडोबा प्रशासनाने खुटवंडा गेटवरच रोखल्याने गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला. ताडोबा प्रशासनाने अभयारण्यात प्रवेश करण्यास नकार दिल्याने रविवारी संध्याकाळपर्यंत भाविकांनी गेटसमोर धरणे दिले. देवदर्शनासाठी परवानगी न दिल्यास रात्रभर गेटसमोर ठिय्या देण्याचा पावित्रा भाविकांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच गोची झाली आहे. धरणे देणाऱ्या भाविकांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला व मुलांचा समावेश होता.दरवर्षी पौष महिण्यात ताडोबा परिसरात असणारे गावकरी प्रत्येक रविवारी ताडोबा देवाच्या दर्शनासाठी जातात. मात्र ताडोबा प्रशासनाने या पूजेला व दर्शनाला आडकाठी केल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या. गेल्या वर्षी गावकऱ्यांनी धरणे दिल्याने त्यांचा रोष पाहून ताडोबा प्रशासनाने गावकऱ्यांना देवदर्शन घेऊ दिले होते. यावर्षी गावकऱ्यांनी ताडोबा प्रशासनाला माधव जीवतोडे व सुधीर मुडेवार यांच्या नेतृत्वात एका निवेदनाद्वारे यावर्षी ताडोबा प्रशासनाला ताडोबा देवाचे दर्शन घेण्याची रितसर सूचना दिली होती. मात्र प्रशासनाने त्यांची विंनती धुडकावून खुटवंडा गेटजवळ पोलीस बंदोबस्त मागितला व विनाकारण तणावाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. रविवारी सकाळपासून परिसरातील दहा ते बारा गावातील शेकडो गावकरी गेटवर गोळा झाले. मात्र संध्याकाळपर्यंत या भाविकांना वनविभागाने प्रवेश दिला नाही. त्यानंतर चिडून भाविकांनी दिवसभर गेटसमोर ठिय्या आंदोलन केले. उशिरापर्यंत प्रवेश न दिल्यास रात्रभर गेटसमोर ठिय्या देण्याचा निर्धार गावकऱ्यांनी केला आहे. धरणे आंदोलनात सुधीर मुडेवार, माधव जीवतोडे, सुधार रंदये, शंकर भरडे, देविदास लाखे, शेख सलाम, नयन जांभुळे, सुमित मुडेवार, पार्वताबाई जीवतोडे, स्रेहल मुडेवार यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
ताडोब्यात दर्शनासाठी गेलेल्या भाविकांना रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:13 PM
लोकमत न्यूज नेटवर्क भद्रावती : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या ताडोबा देवाच्या पूजा-अर्चेसाठी व देवदर्शनासाठी भाविकांना ताडोबा प्रशासनाने खुटवंडा ...
ठळक मुद्देखुटवंडा गेटवर दिवसभर भाविकांचा ठिय्या