राजकुमार चुनारकर।आॅनलाईन लोकमतचिमूर : हल्लीच्या प्रेम कहाण्या म्हणजे दोघांची नजरानजर, मग भेटीगाठी. थोडा कौटुंबिक विरोध आणि सरते शेवटी लग्न. येथे ती प्रेमकथा संपते. पण दिव्यांग मंजिरी व बंसी यांची कवितेच्या माध्यमातून झालेली ओळख आणि मग मोठ्या संघर्षातून झालेला विवाह, समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. नशिबाला चिकटलेल्या व्हीलचेअरच्या बाजुला भक्कमपणे पाय रोवून मंजिरीचा हात हातात घेत बंसीने तिच्या मेंदीभरल्या स्वप्नांना जणू नक्षत्रांचे आंदणच दिले आहे.वर बंसी सर्वच बाबतीत सुदृढ तर वधू मंजिरी दिव्यांग. तिचे संपूर्ण आयुष्यच व्हीलचेअरवरचे. लहाणपणी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तिला आलेले या दिव्यांगत्वामुळे तिचे आयुष्यच पालटले. पण तिची जगण्याची उमेद वाखाणण्यासारखी. ती कविता करायची. कथा लिहायची. तिच्या कविता, कथा अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध होत होत्या. ती विविध विषयांवर लिहायची. आपल्या दिव्यंगत्वावर मात करुन ती नवे क्षितिजे शोधू लागली. तिने साहित्याला जवळ केले. ती नवनवे लेखन करु लागली. अशातच तिच्या वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या कविता चित्रकार व संवेदनशील मनाचा कवी बंसी कोठेवार यांनी वाचल्या. वृत्तपत्रांतील कविता वाचून अभिप्राय देणे, बोलणे सुरु झाले. मैत्री झाली. बंसी अवलिया माणूस. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव (जाट) येथे वास्तव्यास असलेल्या बंसीने आतापर्यंत शेकडो चित्रे काढली. अनेक दिवाळी अंक, वृत्तपत्रात, साप्ताहिक-मासिकांत ती प्रकाशित झाली. अनेक साहित्यिकांच्या पुस्तकांचे मुखपृष्ठ बंसीने आपल्या कुंचल्यातून सजवले. त्यांची चित्रे बघणाºयांना भूरळ पाडणारी. नखचित्रे हाही प्रकार त्यांनी अतिशय उत्कृष्ठपणे हाताळलेला. ग्रामीण भागात राहून कलेची उपासना करणारा हा अवलिया साहित्यक्षेत्रात भरारी घेऊ पाहणाºया मंजिरी भोयर हिच्या जीवनात आला.दोघांची मैत्री फुलत गेली. २०१४ मध्ये ‘दहा बाय दहा’ हा मंजिरीचा काव्यसंग्रह आला. तिला लेखनाची नवी प्रेरणा मिळत होती. साहित्यक्षेत्रात तिचे नाव होऊ लागले. अनेक पुरस्कार तिला या काव्यसंग्रहासाठी मिळाले. अशातच एके दिवशी बंसीने मंजिरीच्या वडिलांना तिच्या लग्नाची मागणी घातली. आपली मुलगी अशी, आयुष्यभर चालू न शकणारी. तिला सर्व बाबतीत सुदृढ असलेल्या व्यक्तीने केलेली मागणी हा वेडेपणा आहे, असे म्हणत मंजिरीच्या वडिलांनी बंसीला स्पष्ट नकार दिला.पण आता बंसी आणि मंजिरी यांची ही अनोखी प्रेमकथा आकार घेऊ लागली होती. तिच्यातील प्रतिभेला नवा आयाम देण्यासाठी लग्न करणार तर मंजिरीशीच; अन्यथा नाही, असा ठाम निश्चय बंसीने केला होता. या त्याच्या निर्णयाला त्याच्या कुटुंबीयांनी सहकार्य केले.मंजिरीच्या कुटुंबीयांची समजूत घालण्याचे काम सुधीर गायकी यांनी केले. आणि ही अनोखी प्रेमकथा चार-पाच वर्षांनंतर ७ फेब्रुवारीला हिंगणघाट जि.वर्धा येथे विवाहबंधनाच्या पवित्र धाग्यात बांधल्या गेली. बंसीचा हा निर्णय आणि त्याचे फलित हा प्रचंड इच्छाशक्तीचा जणू विजयच होता.
दिव्यांग मंजिरीच्या मेंदीभरल्या स्वप्नांना नक्षत्रांचे आंदण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2018 11:57 PM
हल्लीच्या प्रेम कहाण्या म्हणजे दोघांची नजरानजर, मग भेटीगाठी. थोडा कौटुंबिक विरोध आणि सरते शेवटी लग्न. येथे ती प्रेमकथा संपते.
ठळक मुद्देव्हीलचेअरवरचा अनोखा विवाह : सोहळा अनेकांसाठी प्रेरणादायी