धाबा : तेलंगणाकडे जाणाऱ्या धाबा ते पोडसा रस्त्याची सध्या अतिशय दुर्दशा झाली आहे. नागरिकांना या मार्गावरून जाताना कसरत करावी लागत आहे. पावसामुळे या मार्गावरील रपटाही वाहून गेला आहे.
सध्या या रस्त्याचे काम चालू असून, हेटी सकमूर गावाजवळ मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. त्यासाठी वळण रस्ता काढून रपटा बांधला आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्याचे काम चालू केल्यामुळे रहदारीसाठी अडचण येत आहे.
तीन-चार दिवसांपूर्वी पाऊस झाला, तेव्हा हा रपटा वाहून गेला व रहदारी बंद पडली. गुरुवारी जोरदार झालेल्या पावसात पुन्हा रपटा पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे सकमूर, वेडगाव, सोनापूर, लाठी, पोडसा व तेलंगणा राज्याचा संपर्क तुटला. रस्त्यावर खड्डे पडले असून, अपघात होण्याची शक्यता आहे. रस्त्याचे काम ऐन पावसाळ्यात चालू केल्यामुळे ठेकेदाराविरुद्ध नागरिकांत रोष व्यक्त केला जात आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.