चंद्रपूर : दुपारी सुमारे पावणे तीनची वेळ...लोक दुकानांमध्ये येत-जात होते. सर्वत्र हसत खेळत वातावरण...कुणी चर्चेत गुंतलेले तर चहा परीवर कुणाच्या हातात चहाचा प्याला होता. कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक बंदुकीतून धाडधाड गोळ्या सुटल्याचा आवाज येताच सारे वातावरणच क्षणात बदलून गेले. एक बुरखाधारी एका हातात पिस्तूल घेऊन गोळ्या झाडत एका युवकाच्या मागे धावत होता. हे चित्रपटात दिसणारे दृश्य प्रत्यक्षात बघताना अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. आपल्यालाही गोळी लागेल... या भीतीने जो तो मिळेल त्या दिशेने पळत होता. काही क्षणात घडलेल्या या थराराने नेहमी हसत खेळत असलेला परिसर एकाएकी दहशतीत गेला. ज्यांनी ही घटना आखो देखी बघितली त्यांच्या तोंडून शब्द फुटत नव्हते. शहराच्या गजबजलेल्या रघुवंशी काॅम्प्लेक्स परिसरात अशी घटना घडेल हा विचार कोणीही केलेला नव्हता...ही घटना चंद्रपूरकरांना दहशतीत नेणारी असल्याच्या भीतीयुक्त प्रतिक्रिया सर्वत्र उमटू लागल्या.
रघुवंशी काॅम्प्लेक्समध्ये अनेक दुकाने आहेत. बाजूलाच धनराज प्लाझा. येथेही गर्दी असते. या ठिकाणी दररोज हजारांवर नागरिकांची खरेदीसाठी ये-जा असतात. चंद्रपुरातील अतिशय सुरक्षित परिसर म्हणून मनात भीती न बाळगता नागरिक बिनधास्त वावरत असतात. बाजूला लागूनच आझाद गार्डन आहे. या ठिकाणी दररोज शहरातील कानाकोपऱ्यातील नागरिक सकाळी फिरायला येतात. शेकडो नागरिक व्यायाम करीत असतात. बाजूलाच एक पानटपरी आहे. या टपरीवर अनेकजण सकाळचा चहा घेतात. यावेळी शहरातील महत्त्वपूर्ण घडामोडींवर गप्पाही रंगतात. पहाटेपासूनच हा परिसर गजबजलेला असतो. या ठिकाणी हत्येचा कट रचला जातो. ही बाब चंद्रपूरकरांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. आरोपी गोळीबार करीत सुटला असता या परिसराची सुरक्षा सांभाळत असलेल्या केसर नावाच्या व्यक्तीचा चिमुकला तेथे नेहमीप्रमाणे फिरत होता. तो आरोपीला आडवा आला होता. सुदैवाने त्याला गोळी लागली नाही. या घटनेने चंद्रपूरकर चांगलेच हादरले आहेत.
बल्लारपूरची वाटचाल पुन्हा गँगवाॅरकडे...
बल्लारपूर शहर एकेकाळी गँगवाॅरसाठी विदर्भात कुप्रसिद्ध होते. रात्री-दिवसाही हातात तलवारी घेऊन गुंड एकमेकांच्या मागे धावतानाचे प्रकार नेहमीचेच झाले होते. येथील गुंडांची सर्वत्र दहशत होती. कोणी-कोणाला मारत असले तरी मधात कोणी पडत नव्हता. वेकोलिचा परिसरही गुंडांच्या दहशतीत होता. कालांतराने हे गुंड आपसातच लढून संपले. तेव्हापासून ही दहशत काही प्रमाणात कमी झाली. मात्र गेल्या काही वर्षांपासून पुन्हा काही गुंड आपली दहशत गाजवू लागले. यातून सुरज बहुरिया हत्याकांड घडले आणि येथून बल्लारपुरात गँगवाॅरने पुन्हा डोके वर काढल्याचे बोलले जात आहे.