राजुरा : महाराष्ट्र सरकारच्या महाजेनकोकरिता कोळसा खरेदी करणाऱ्या करारावर ठाम निर्णय न घेतल्याने या दुहेरी भूमिकेमुळे कोळसा उत्पादन करण्यास अडचण होत आहे. धोपटाळा यूजी टू ओसी प्रकल्प सुरू करण्यास बाधा निर्माण झाल्याने प्रकल्पग्रस्तांना मोबदला व नोकऱ्या मिळण्यास अडथळा निर्माण झाला आहे. धोपटाळा प्रकल्पाचे काम सुरू झाल्यानंतर चिंचोली प्रकल्पास प्राधान्य देऊ, असे वेकोली अधिकाऱ्यांचे म्हणणे असले, तरी हे अधिग्रहण रद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे कळते. तथापि, हे अधिग्रहण रद्द केल्यास परिणाम भोगावे लागतील, असा इशारा माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिला. प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्यांचे निराकरण त्वरित करावे, अशी सूचनाही केली.
धोपटाळा, चिंचोली रिकास्ट व पौनी-३ प्रकल्पातील प्रलंबित मागण्यांसंदर्भात शुक्रवारी वेकोली, बल्लारपूर क्षेत्राच्या धोपटाळा कार्यालयात हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये वरील प्रकल्पाशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली. यावेळी प्रकल्पग्रस्तांना जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात होत असलेल्या विलंबाची कारणे विचारण्यात आली. मोबदला व नोकरीसंदर्भातील प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची सूचना क्षेत्रीय महाप्रबंधकांना केली. यापुढे प्रकल्पग्रस्तांना नोकरीपूर्वी एक महिन्याचे प्रशिक्षण नागपूरला करावे लागणार असल्याच्या निर्णयास विरोध करून ज्या प्रकल्पात नोकरी देण्यात येणार, तिथेच प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचना बैठकीत केली. प्रकल्पग्रस्तांचा नोकरी व मोबदल्याबाबत जो छळ चालविला गेला आहे, तो त्वरित थांबविण्यात यावा. धोपटाळा यूजी टू ओसी तसेच चिंचोली रिकास्ट प्रकल्पाची प्रक्रिया पूर्ण झालेली असताना मोबदला व नोकऱ्या थांबविणे अन्यायकारक असून त्यावर तातडीने निर्णय घेऊन न्याय द्यावा, असे सांगितले. या बैठकीला माजी आमदार ॲड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, खुशाल बोंडे, मधुकर नरड, राजू घरोटे, प्रशांत घरोटे, कोलगावचे सरपंच पुरुषोत्तम लांडे, सास्ती सरपंच रमेश पेटकर, रामपूरचे सरपंच गौरकार, सचिन शेंडे आदींची उपस्थिती होती.