राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आपात्कालीन आरोग्य सेवेसाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने सुरू केलेल्या ‘डायल १०८’ क्रमांकाची रूग्णवाहिका कोरोना काळात जिल्ह्यातील आठ हजार रूग्णांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. विशेष म्हणजे या रूग्णवाहिकेने चार वर्षांत ९५ हजार ६२४ रूग्णांना वेळेवर रूग्णालयात पोहचवून यशस्वीरित्या उपचाराकरिता मोलाची मदत केली.ग्रामीण व आदिवासी भागातील रूग्णांना वेळेवर उपचार व्हावे, या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत २०१४ रोजी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेला सुरूवात केली. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही दळणवळणाच्या सोई उपलब्ध पुरेशा नाहीत. त्यामुळे रूग्णांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रूग्णालय किंवा शहरातील रूग्णालयात उपचारासाठी आणणे अडचणीचे ठरत होते. त्यामुळे अनेकांना जीव गमावावा लागत होता. मात्र, १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने ही परिस्थिती बदलविली.
सन २०१४ पासून या रूणवाहिकेने ३० सप्टेंबर २०१८ पर्यंत ९५ हजार ६२४ रूग्णांना जीवदान दिले आहे. कोरोनामुळे जिल्ह्यात लॉकडाऊन झाल्यानंतर या रूग्णवाहिकांचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, विभागीय प्रादेशिक व्यवस्थापक डॉ. प्रशांत घाटे व जिल्हा व्यवस्थापक डॉ. चेतन कोरडे आदींनी उपलब्ध रूग्णवाहिकांचे उत्तम नियोजन केले. जिल्ह्यातील २३ पैकी १६ रूग्णवाहिका कोविड १९ साठी अधिग्रहित केल्या आहेत. २३ रूग्णवाहिकांवर ५२ चालक आणि ४१ डॉक्टर अविरत सेवा देत आहेत. जुन २०२० पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील आठ हजार रूग्णांना रूग्णवाहिकेद्वारे रूग्णालयात दाखल करून यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. त्यामुळे १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका रूग्णांसाठी जीवनदायिनी ठरत आहे.खासगी रूग्णवाहिकांचा डेटा बेसकोविड १९ च्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्ह्यातील ‘डायल १०८’ आणि सर्व खासगी रूग्णवाहिकांचा डेटा बेस तयार करण्यात आला. आवश्यकतेनुसार रूग्णवाहिका अधिग्रहित करून रूग्णांना उपलब्ध करून देण्याचे काम सुरूच आहे. यासाठी सर्व नगर परिषद, चंद्रपूर महानगर पालिका, सामाजिक संस्था व सेवाभावी व्यक्तींकडून जिल्हा प्रशासनाला मदत मिळत आहे.कोविड १९ व नॉनकोविड रूग्णांना रूग्णवाहिकाविना उपचारासाठी अडचणी येवू नये, या हेतूने शासनाच्या निर्देशानुसार नियोजन तयार आहे. त्यानुसारच रूग्णवाहिका उपलब्ध करून दिले जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आढळलेल्या कुठल्याही रूग्णालाही तात्काळ रूग्णालयात पोहोचविण्यासाठी रूग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.-डॉ. प्रशांत घाटे, विभागीय प्रादेशिक व्यवस्थापक, नागपूर