चारचाकी गाडी सोडून चोरट्यांनी काढला पळ : दोन लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त
सास्ती
: वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सास्ती खुल्या कोळसा खाणीत १७ मार्चला रात्री उभ्या असलेल्या एक्साव्हेटर मशीनमधून
डिझेल चोरण्याचा प्रयत्न करीत असताना
अचानक कामगार खाणीत आल्यामुळे चोरट्यांनी आपली चारचाकी गाडी तिथेच सोडून पळ काढल्याने चोरी टळली; मात्र यामुळे वेकोलिच्या सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
वेकोलिच्या बल्लारपूर क्षेत्रांतर्गत सास्ती खुल्या कोळसा खाणीत मागील अनेक दिवसांपासून चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. या कोळसा खाणीतून डिझेलसह इलेक्ट्रिक वायर सामानाचे सुटे भाग आणि इतर साहित्य चोरून नेण्याच्या अनेक घटना घडत आहेत. अशीच एक घटना १७ मार्चला रात्री नऊ वाजताच्या सुमारास सास्ती कोळसा खाणीतील कोळसा स्टॉक-२ वर घडली. चोरटे आपली चारचाकी वाहने या ठिकाणी पोहोचून तिथे उभ्या असलेल्या एक्साव्हेटर मशीनमधून जवळपास पाच कॅन डिझेल भरले. अचानक यावेळी खाणीत काम करणारे कामगार पोचल्यामुळे चोरट्यांनी आपली चारचाकी तिथेच सोडून पळ काढला.
यावेळी वेकोलिच्या सुरक्षारक्षकाच्या पथकाने येथे भेट देऊन घटनेची माहिती पोलिसांना दिली.
राजुरा पोलिसांनी घटनास्थळावरून झायलो गाडी (क्रमांक एम एच ३१ ३६७८), पाच कॅनमध्ये भरलेले १७५ लिटर डिझेल व आठ रिकाम्या कॅन असा एकूण दोन लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.