अन्नदात्यांची वैफल्यग्रस्त व्यथा : चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या अनेकश्वर मेश्राम बल्लारपूरराज्यात वर्षभरात तीन हजारांवर शेतकऱ्यांनी कर्जबाजारीपणाला व नापिकीला कंटाळून जीवन संपविले. जगाचा पोशिंदा असा हतबल झाला आहे, विदर्भातील याचे प्रमाण अधिक आहे. याला अपवाद चंद्रपूर जिल्हाही ठरला नाही. मागील चार महिन्यात जिल्ह्यातील २० जणांनी काळ्या आईला अंतर देत जीवन प्रवास थांबविला आहे. समाजाचा आधारस्तंभ कोसळत असताना वैफल्यग्रस्त अन्नदात्यांची व्यथा राज्यकर्त्यांना आजतागायत जाणून घेता आलीच नाही, हे विदारक सत्य आहे.बळीराजा मानव जातीचा व पशुपक्षांचा पोशिंदा आहे. व्यवसाय करता येत नाही, म्हणून पिढ्यानं पिढ्यापासून ऋणानुबंध जोपासून शेती करतो. त्यांच्या परिश्रमातून घराघरातील अन्नपूर्णा प्रसन्न असते. नांगर, बैलजोडी, पशुधन, फावडे, कुदळ, खुरपणे आणि शिवारातील माती हाच त्याचा नित्यक्रम असतो. याचेशी बळीराजाचे भावनिक नाते जडले आहे. मात्र निसर्गाचे दुष्टचक्र फिरते. कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटाच्या चक्रव्यूहात अलगद अडकतो. ‘काळी आई’ त्याचे अपार प्रेम करते. मात्र नापिकी, अतिवृष्टी तर अवर्षण संकटाशी दोन हात करताना नाउमेद होवून मृत्यूला जवळ घेतो. बळीराजाच्या मृत्यूची किंमत शासनाने एक लाख रुपये निर्धारित केली आहे. यातून त्यांच्या मुलाबाळांचे अश्रु पुसण्याचा देखावा निर्माण केला आहे. त्यांचे सांत्वन करण्यापलिकडे काही सोपस्कार नाही. ती तत्कालिन स्वरुपाची आहे. शेती करुन फायदा काय, या विंवचनेतून शेतकऱ्यांच्या आत्महत्या करण्याचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. शेती फायदेशीर होण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे क्रमप्राप्त आहे. त्यांच्यातील जिद्दीच्या श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी तजविज करण्याची गरज असून तेव्हाच शेतकरी जगेल. या शेतकऱ्यांनी केली आत्महत्याचंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात पाहर्णी गावातील सुरेश शामराव कुंभरे (४१) याने याच कारणावरुन २४ जानेवारीला विष प्राशन करुन मृत्यूला कवटाळले. याच तालुक्यातील देविदास तुळशीराम थेरकर (४०) रा. गोविंदपूर, रामदास मारोती घ्यार (४५) रा. मांगली, मनोज एकनाथ पिंपळशेंडे (४५) रा. मार्डा ता. वरोरा, प्रशांत भाऊराव टोेंगे (५५) रा. नंदोरी ता. भद्रावती, गुरुदेव किसन चलाख (५५) रा. करोडा ता. सावली, हरिश्चंद्र परशुराम चनेकर (२६) रा. धाबा ता. गोंडपिंपरी, विनायक सिताराम चौधरी (५७) रा. गोजोली ता. गोंडपिंपरी, रितेश गोपाळराव ढेंगळे (५५) रा. चिनोरा ता. वरोरा, संजय प्रभाकर बदकी (३१) रा. महालगाव ता. वरोरा, तेजराज विठोबा बोरकर (४७) रा. नवरगाव ता. सिंदेवाही, दिलीप बाबुराव कामडी (३८) रा. कळमगाव गन्ना ता. सिंदेवाही यांच्यासह २० जणांनी तीन महिन्याचा कालावधीत कर्ज आणि नापिकीला कंटाळून संघर्षमय जीवनाला हताश होता काळ्या आईला निराधार करीत अंतर दिल्याच्या घटना घडल्या आहेत.
२० जणांनी दिले काळ्या आईला अंतर
By admin | Published: April 29, 2016 1:01 AM