चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर या मुख्य मागर्गावर अनेक दुचाकी व चारचाकी विक्री दुकाने सजली आहेत. त्यामुळे रहदारीस अडचण होत आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. याकडे अनेकदा लक्ष वेधण्यात आले.
रुग्णालयात वैद्यकीय कक्ष स्थापन करावे
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरीही अनेक कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. ग्रामीण भागातील रुग्णांना नेमकी कुठे तपासणी करायची व कुठे भरती करायचे याबाबत माहिती नसल्याने वैद्यकी कक्ष स्थापन करण्याची गरज आहे.
शासकीय कार्यालयातील बॉयोमेट्रिक बंद
चंद्रपूर : जिल्ह्यातील शासकीय कार्यालयात कर्मचारी, अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहावेत, याकरिता अनेक कार्यालयांमध्ये बॉयोमेट्रिक मशीन बसविण्यात आलेल्या आहेत. मात्र कोरोनाने त्या मशीन काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्मचारी बिनधास्त आहेत.
सुविधेपासून ग्रामपंचायत वंचित
चंद्रपूर : ग्रामपंचायत स्तरावरील संपूर्ण दस्तावेज ऑनलाइन करण्यासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. मात्र अजूनही तालुक्यातील बऱ्याचशा ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या नाहीत. त्यामुळे आधुनिक सुविधांपासून वंचित आहेत.
येलापूर-येन्सापूर रस्त्याची दुरुस्ती करा
कोरपना : तालुक्यातील येलापूर, येन्सापूर, कारगाव, पिपरी, बाखर्डी ते नांदा आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण होते.
जड वाहतुकीवर बंदी घालण्याची मागणी
नागभीड : तालुक्यात रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. हा प्रकार जिल्ह्यातील काही भागात सर्रास सुरू असून जड वाहतुकीमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.
बाराजारातील कचरा हटविण्याची मागणी
गडचांदूर : येथील रेल्वे फाटकाजवळ असलेला कचरा डेपो बंद करावा, अशी नागरिकांची मागणी आहे. मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात कचरा टाकल्या जात असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने समस्य जैसे थे आहे.
नळयोजनांना तांत्रिक अडचणीचे ग्रहण
ब्रह्मपुरी : तालुक्यातील अनेक गावांत नळयोजनेअंतर्गत लाखो रुपये खर्च करून पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. परंतु या टाक्या शोभेच्या वास्तू ठरत आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे अनेक गावांत नळयोजनेचे पाणी मिळत नसल्याने ग्रामीण नागरिकांनी पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
ग्रामीण भागात शौचालयांचा गैरवापर
पोंभुर्णा : परिसरातील अनेक गावांत गोवऱ्या, सरपणाची लाकडे, निरुपयोगी वस्तू नागरिक शौचालयात भरून ठेवतात. त्यामुळे ग्रामीण भागात शौचालयाचा गैरवापर होत आहे. गोदरीमुक्ती योजना यामुळे असफल होत आहे. जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे.
आवळगाव ते कोसंबी रस्त्याची दुरवस्था
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव ते कोसंबी रस्त्याची अत्यंत दैना अवस्था झाली आहे. हा रस्ता कित्येक वर्षांपासून कच्चा असून, या संपूर्ण रोडची गिट्टी उखडलेली असून, मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे अनेकदा या रस्त्यावर अपघाताच्या घटना घडत आहे. बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी आहे.