घोसरी : पोंभूर्णा तालुक्यातील दिघोरी येथे तापाच्या साथीने थैमान घातले आहे. अनेक रुग्ण अंथरुणावर खिळलेले आहेत. ऐन रोवणी हंगामात नागरिकांना तापाच्या साथीने ग्रासले असल्याने उपचारासाठी इतरत्र धाव घेऊन आर्थिक भार पेलावा लागत आहे. गावातील डेंग्यूसदृश तापामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
नवेगाव मोरे आरोग्य प्राथमिक केंद्रांतर्गत दिघोरी गावाची लोकसंख्या जवळपास १ हजार ३०० आहे. आरोग्याच्या दु्ष्टीने गाव संवेदनशील आहे. येथील नागरिकांना दरवर्षी तापाच्या साथीचा सामना करावा लागत असतो. गावासभोताल खताचे खड्डे व घराजवळ डबके साचून राहात असल्याने डासांचा प्रादुर्भाव होतो. वातावरण बदलामुळे तापाची साथ उद्भवत असल्याचे आरोग्य कर्मचारी सांगत आहेत. आरोग्य पथकाकडून रुग्णांचे रक्त नमुने व इतर उपाययोजनांमध्ये फॉगिंग धूळ फवारणी करून साथ आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक कुटुंबांतील रुग्ण अंथरुणावर फणफणत आहेत. आरोग्य पथकाच्या रक्त नमुना तपासणी अहवाल अजूनपर्यंत प्राप्त झालेले नाही. खासगी तपासणीत डेंग्यूसदृश ताप असल्याचे दर्शवित आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. खासगी उपचार करून अनेकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.
आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी पद रिक्त
प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरेअंतर्गत २६ गावे येतात. अनेक गावे आरोग्याच्या दृष्टीने संवेदन आहेत. येथे दोन नियमित दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदांना मान्यता आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. जोगदंड यांचृा कार्यकाळ दि.२२ जून व डॉ. शेख यांचा कार्यकाळ २० जुलै २०२१ रोजी संपलेला असल्याने ते पदमुक्त झालेले आहेत. यासोबतच आरोग्य सेविका व आरोग्य सेवक यांचीही पदे रिक्त असल्याने येथील आरोग्य सेवा कोलमडली आहे.
येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने अन्य डॉक्टरांकडून रुग्ण सेवा दिली जात आहे. दिघोरी येथे फॉगिंग धूर फवारणी या उपाययोजना करून आरोग्य पथकाकडून साथीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. जनतेनेसुध्दा डास उत्पत्ती केंद्र नष्ट करून सहकार्य करावे.
- डॉ. संदेश मामीडवार, तालुका वैद्यकीय अधिकारी, पोंभूर्णा