१४ वा वित्त आयोग : चौकशी करून कारवाई करण्याची अपेक्षाब्रह्मपुरी : जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील शाळा प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्व शाळा डिजिटल करण्याच्या आदेशाप्रमाणे भर देण्यात आला. परंतु १४ व्या वित्त आयोगातून खरेदी केलेल्या डिजिटल संचाच्या खरेदीमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. या खरेदीची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी पालकवर्गाकडून केली जात आहे.बदलत्या काळानुसार शिक्षणाच्या प्रवाहात म्हणजे अध्ययन व अध्यापनात बदल होणे काळाची गरज आहे. पूर्वी शिक्षण क्षेत्राला पवित्र समजले जात होते. परंतु अलीकडे शिक्षण क्षेत्राबाबत बरेवाईट बोलले जात आहे. शासनाने सर्व प्राथमिक शाळा अद्यावत ज्ञानासाठी डिजिटल करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार लोकवर्गणीच्या माध्यमातून गावातील काही नेत्यांनी, समजदार नागरिकांनी व शिक्षकांनी आपल्या पैशातून संच खरेदी करून शाळेच्या विकासाला हातभार लावला आहे. परंतु तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांना १४ व्या वित्त आयोगाच्या निधीमधून पुन्हा एक संच देण्यात आला. या संचाच्या खरेदीपासून तर त्यांच्या टिकावूपणापर्यंत शंका घेतली जात आहे. लोकवर्गणीतून घेतलेला संच २० ते २२ हजारपर्यंत घेतला गेला पण १४ व्या वित्त आयोगातून घेतला गेलेला संच ३० ते ३५ हजारापर्यंत घेतल्या गेल्याचे उघडकीस आले आहे. संच एकाच कंपनीचा पण घेणारे वेगवेगळे असल्याने माणूस पाहून किंमत वाढलेली दिसून येत आहे. तसेच संच खरेदीसाठी एकाच दुकानाची सक्ती केली जात असल्याने ‘मूँह मांगे दाम’, अशा अवस्थेत खर्च केला गेला आहे.आज एका संचावर पाच ते दहा हजार रुपये अतिरिक्त दिले गेल्याने शेकडो संचावर केलेला अतिरिक्त खर्च कोणाकोणाच्या घशात पडलेला आहे, याची विभागीय चौकशी करून दोषींवर कार्यवाही करण्याची मागणी केली जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
डिजिटल संच खरेदीत घोटाळा
By admin | Published: April 13, 2017 12:50 AM