प्रकाश पाटील
मासळ बु : चिमूर तालुक्यातील मासळ बु. येथील अंगणवाडी क्र. १ व २च्या इमारती जीर्ण झाल्या आहेत. अंगणवाडी क्र. १च्या इमारतीत दोन्ही अंगणवाड्या भरत आहेत. या इमारतीच्या छताचे तुकडे पडत आहेत. ही इमारत केव्हाही पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तरीही अंगणवाडी मागील पाच वर्षांपासून येथे भरत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
मागील सहा वर्षांपूर्वी मासळ बु. येथील अंगणवाडी क्र. २च्या इमारतीला मोठया प्रमाणात भेगा पडल्या. तसेच स्लॅबचे छोटे - छोटे तुकडे पडत असल्याने अंगणवाडी क्र. २ मधील विद्यार्थ्यांना पाच वर्षांपूर्वी अंगणवाडी क्र. १मध्ये हलविण्यात आले.
मागील वर्षी अंगणवाडी क्र. १च्या छाताचा मोठा तुकडा खाली पडला. यामध्ये अंगणवाडी सेविका थोडक्यात बचावल्या. छताचे छोटे - छोटे तुकडे पडणे सुरूच आहे. त्याच ठिकाणी लहान मुलांचे लसीकरण, मुलांचे वजन घेणे, गरोदर महिला व स्तनदा मातांना जेवण दिले जाते. काही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न अंगणवाडी सेविकांना पडला आहे. लॉकडाऊन काळात अंगणवाडीत मुले बोलावण्यास शासनाची मनाई आहे. या ठिकाणी फक्त गरोदर महिला, स्तनदा माता यांना जेवण देणे, लसीकरण करणे, मुलांचे वजन करणे इत्यादी बाबी सुरू आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
निर्लेखनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेमध्ये धूळखात
प्रशासनाने यांची दखल घेऊन अंगणवाडी क्र. १ व क्र. २च्या इमारती निर्लेखन करून दोन्ही नवीन इमारती मंजूर कराव्यात, अशी मागणी होत आहे.
तसा प्रस्ताव ग्रामपंचायतीने सन २०१३ - २०१४ या वर्षात जिल्हा परिषदेला पाठविला होता. परंतु प्रशासनाने अजूनही याची दखल घेतली नाही.