वसंत खेडेकर
बल्लारपूर : आपल्या ठसठशीत व बोलक्या अभिनय प्रतिभेने सिनेदर्शकांच्या मनावर सुमारे ६० वर्षांहून अधिक काळापर्यंत अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते, ट्रॅजेडी किंग व अभिनयसम्राट दिलीपकुमार हे ३५ वर्षांपूर्वी १९७६ च्या डिसेंबरमध्ये चंद्रपूरला आले होते. निमित्त होते, चंद्रपूरला आयोजित अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाचे.
चंद्रपूर येथील स्व. कन्नमवार सभागृहात स्व. लालबहादूर शास्त्री मेमोरियल अखिल भारतीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीस समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून दिलीप कुमार हे उपस्थित झाले होते. त्यांच्यासोबत प्रसिद्ध हास्य अभिनेता जॉनी वाॅकर हेही होते. सोबतच तत्कालीन केंद्रीय मंत्री ॲड. एन. के. पी. साळवे होते. स्पर्धेचा अंतिम सामना त्यांच्या समक्ष झाला. स्पर्धेच्या उत्कृष्ट आयोजनाची प्रशंसा करीत, मीही बॅडमिंटनचा उत्तम खेळाडू असल्याचे दिलीप कुमार यांनी भाषणातून सांगितले. एवढ्यावरच न थांबता रॅकेट हातात घेऊन ते मैदानावर आले आणि स्पर्धेतील खेळाडूंशी बॅडमिंटन खेळत काही क्षण खेळाचा आनंद घेतला. त्यांनी बराच वेळ चंद्रपुरात घालविला. त्यानंतर त्यांनी जयंत मामीडवार यांच्यासोबत ताडोबाची सफारीही केली. जाॅनी वाॅकरही या सफारीत होते.
दिलीप कुमार यांना बघण्याकरिता प्रेक्षकांनी क्रीडा स्पर्धा स्थळ तसेच ताडोबा परिसरात खूपच गर्दी केली होती. योगायोगाने याचवेळी त्यांच्या अभिनयाने नटलेला चित्रपट चंद्रपुरात लागला होता.