चंद्रपूर : किमान शैक्षणिक पात्रता नसताना केवळ अनुभव व माहितीच्या आधारावर व्यवसाय करूनही कीटकनाशके हाताळणी व विक्रीसंदर्भात गंभीर चुका पुढे आल्याने केंद्र सरकारने एक वर्षाचा शास्त्रोक्त पदविका अभ्यासक्रम तयार केला. हा अभ्यासक्रम राज्यातील ४५ हजार कीटकनाशक विक्रेत्यांना पूर्ण करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, कोविडमुळे प्रशिक्षण व प्रवेश प्रक्रियाही लांबणीवर पडली आहे.
कृषी केंद्रांमधून कीडनाशकांची विक्री, वितरण तसेच साठवणूक करणाऱ्या व्यक्ती किमान पदवीधारक असावा, ही अट केंद्र सरकारने लागू केली. यासाठी केंद्रीय कीटकनाशक कायद्यातही बदल करण्यात आला. परिणामी, अनेक वर्षांपासून अनुभवाच्या आधारे कीटनाशक विक्री करणाऱ्यांसमोर समस्या निर्माण झाली. कृषी पदवीच नसल्याने नवीन कायद्यानुसार कीडनाशके व्यवसायातून बाद होण्याची वेळ आली. प्रामुख्याने जुन्या विक्रेत्यांसमोर ही समस्या उभी ठाकली. ऑल इंडिया अॅग्रो डीलर्स असोसिएशन व अन्य संघटनांनी याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यानंतर किमान शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांसाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
असे आहे अभ्यासक्रमाचे स्वरूप
अभ्यासक्रम तयार करण्यास कृषी विद्यापीठ व कृषी महाविद्यालयांनी सहकार्य केले. परीक्षा व संनियंत्रणाची जबाबदारी केंद्र सरकारच्या एआयडीपीआर व हैदराबाद येथील मॅनेज या दोन संस्थांकडे आहे. राज्यातील कृषी विभाग आत्मा, नागपुरातील वनामती संस्थेचीही महत्त्वाची भूमिका आहे. यात कृषिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणिशास्त्र, जैवतंत्रज्ञान, जैवरसायन व जीवशास्त्राशी निगडित विविध विषयांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दोन केंद्र
चंद्रपूर जिल्ह्यात कृषी तंत्रनिकेतन आनंदवन वरोरा व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ संचालित सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रात प्रत्येकी एकप्रमाणे दोन केंद्र सुरू आहेत. दोनही केंद्रातून १६० विक्रेते प्रशिक्षित झाले. त्यापुढील बॅचेसलाही प्रवेश देण्यात आला. सध्या कोविडमुळे प्रशिक्षण बंद आहे.
कोट
अभ्यासक्रमाचे स्वरूप अत्यंत उपयुक्त आहे. प्रवेश घेण्यासाठी किमान दहावी उत्तीर्ण अथवा प्रवेशित तसेच कीटकनाशके विक्री परवानाधारक असावा. उपस्थितीसाठी बायोमेट्रिकचा वापर होतो. अटींची पूर्तता करणाऱ्यांनाच प्रवेश मिळतो. एका बॅचमध्ये ४० जण असतात. आठवड्यातून एक दिवस वर्ग भरतो. विक्रेत्यांनी मन लावून ज्ञान मिळविल्यास शेतकऱ्यांच्या अनेक समस्या दूर होतील.
-प्राचार्य हर्षदा पोतदार, कृषी तंत्रनिकेतन आनंदवन, वरोरा, जि. चंद्रपूर