चंद्रपूर : जिल्हा पोलिस दलात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील तत्कालीन पोलिस निरीक्षक, तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक, तसेच दोन सहायक पोलिस निरीक्षक व नऊ पोलिस हवालदारांना उल्लेखनिय कामगीरीबद्दल पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. यामुळे चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाचा गौरव वाढला आहे. १ मे महाराष्ट्र दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी २०२३ वर्षातील पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर केले आहेत. राज्यातील ८०० अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हे पदक मिळाले आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्हा पोलिस दलातील १३ जणांचा समावेश आहे. यापैकी सन २०२३ मध्ये चंद्रपूर शहर पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून असलेले तत्कालीन ठाणेदार सतीश सिंग रणजितसिंह राजपूत, तसेच चंद्रपूर भरोसा सेलमधील तत्कालिन पोलिस उपनिरीक्षक अश्विनी शामराव वाकडे (झाडे) यांनाही हे सन्मानचिन्ह मिळाले आहे. सद्य:स्थितीत या दोघांचीही जिल्हा बदली झाली आहे. यासोबतच सपो उपनिरीक्षक राजेंद्र किसान तुमसरे, सपो उपनिरीक्षक गुलाब रामचंद्र बल्की, तसेच पोलिस हवालदार विक्रम व्यंकटराव नवरखेडे, नईमखान ताजमहम्मद खान, शकील गुलाब शेख, लक्ष्मण नानाजी धांडे, अर्जुन भिवा मडावी, नागो लहानुजी दाहागांवकर, गणेश विष्णूजी मेश्राम, मंगेश वामनराव मत्ते, महिंद्र खुशालराव बेसरकर यांनाही पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह मिळाले आहे. यामुळे चंद्रपूर जिल्हा पोलिस दलाचा गौरव वाढला आहे.कुणाला मिळते पदकमहाराष्ट्र पोलिस विभागात विविध प्रकारच्या प्रवर्गांमध्ये केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल आणि उल्लेखनीय, प्रशंसनीय सेवेबद्दल महासंचालकांचे सन्मानचिन्ह मिळत असते. चंद्रपुरातील वरील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियुक्तीपासून आजपर्यंत केलेल्या कामगिरीच्या आधारावर हे पदक जाहीर झाले आहेत. पोलिस उपनिरीक्षक अश्विनी वाकडे यांनी भरोसा सेलमध्ये जिल्ह्यात गौरवपूर्ण कामगिरी करून अनेक मोडणारे संसार फुलविले आहेत, तसेच बऱ्याच पोस्को गुन्ह्यांमध्ये त्यांनी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत. यासोबतच जास्तीत जास्त गुन्हे दोषसिद्धी केल्यामुळे प्रवर्ग ३ नुसार त्यांना सन्मानचिन्ह जाहीर झाले आहे. तसेच ठाणेदार सतीश सिंग रणजितसिंह राजपूत यांनीसुद्धा शहर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हेगारीवर अंकूश लावण्यात यश मिळविले होते. दोघांनीही केलेली कामगिरी उल्लेखनीय असल्याने त्यांना सन्मानचिह जाहीर झाले आहे.