नागभीड : ‘गणा रे गणा, गण गेले वरच्या राना, वरच्या रानातून आणली माती, ते देल्ली गुरूच्या हाती, गुरूनं घडविला महानंदी, तो नेला हो पोळ्यामंदी, एक नमन गौरा पारबती हर.. बोला हर.. हर.. महादेव’ ही पोळ्यात म्हटली जाणारी झडती आहे. सोशल मीडियावर या व अशा झडत्यांची जुगलबंदी असायची. मात्र ही जुगलबंदी सोशल मीडियावर यावर्षी म्हणावी तेवढी झडलीच नाही.
पोळा आणि झडत्या यांचे अतूट नाते आहे. सामान्य माणसाच्या हातात मोबाईल आल्यापासून पोळ्याच्या दिवशी तर या झडत्यांना महापूर यायचा. मात्र यावर्षी झडत्या सोशल मीडियावर दिसल्याच नाहीत. बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा. शेतकरी व बैलांविषयीची कृतज्ञता पोळ्याच्या दिवशी झडत्यांतून व्यक्त होते. पोळ्याच्या दिवशी ज्या ठिकाणी पोळा भरतो, त्या ठिकाणी झडत्यांचा मुकाबला रंगतो. मात्र गेल्या वर्षीच्या पोळ्यापासून कोरोनामुळे पोळा भरवण्यावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे या झडत्यांवरही आपोआपच मर्यादा आल्या.
मात्र गेल्या काही वर्षापासून सोशल मीडियावर या झडत्यांचा महापूर असायचा. पोळ्याच्या दिवशी बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या झडत्या तर सोशल मीडियावरून झडायच्याच. पण या झडत्यांचे विडंबन करून चालू घडामोडी आणि समस्यांवर रचलेल्या झडत्या मोठ्या प्रमाणावर ‘व्हायरल’ होत होत्या. मात्र यावर्षी सोशल मीडियावर पोळ्याच्या दिवशी ना बैलांवर आधारलेल्या झडत्या दिसल्या आणि ना चालू परिस्थिती व समस्यांवर विडंबन केलेल्या झडत्या दिसल्या.