औष्णिक वीज केंद्र : अभियंते, रसायनशास्त्रज्ञ, पर्यावरण तज्ज्ञांचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्रातर्फे प्रदूषण नियंत्रणावर नागपूर येथे ‘औष्णिक विद्युत, रसायनशास्त्र आणि शाश्वत पर्यावरण’ या विषयावर दुसऱ्या आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेचे आयोजन करण्यात आले.या परिषद अभियंते, रसायनशास्त्रज्ञ तसेच पर्यावरण शास्त्रज्ञ व विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयातील तज्ज्ञ व अभ्यासूंना एकत्र आणून औद्योगिक प्रदूषणावर विचारमंथन करण्यात आले. प्रदूषणाला आळा घालण्यासंबंधी दिशादर्शक उपाय योजनांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली. ‘उद्योगात पाणी वापर, संवर्धन पर्यावरण परिणाम’, या विषयावर ख्यातनाम जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंग तर ‘कार्यक्षमता वाढ व स्थिरता’ या विषयावर नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. विलास सपकाळ व महानिर्मितीचे कार्यकारी संचालक कैलास चिरुटकर यांनी विचार मांडले. परिषदेच्या आयोजनामागची भूमिका चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता जयंत बोबडे यांनी मांडली. दुसऱ्या सत्रात डॉ. साधना रायलू, डॉ. श्रीपाल सिंग, श्रीनिवास नागराज, डॉ. सीमा श्रीवास्तव, डॉ. टी. डी. कोसे, डॉ. बागची, डॉ. आर. आर. खापेकर यांनी विचार मांडले. परिषदेच्या निमित्ताने पोस्टर स्पर्धा, विद्यार्थी, संशोधक व व्यावसायिक यांच्याकडून लघु शोधनिबंध मागविण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने औष्णिक वीज केंद्रातील पर्यावरण विषयक प्रश्न, सांडपाणी प्रक्रिया व पूनर्वापर, घनकचरा व्यवस्थापन, हरित रसायन तंत्रज्ञान, पर्यावरणाचा समाजावर परिणाम, एफजीडी वापर, कुलिंग टॉवर व सांडपाणी प्रक्रियेत क्लोरिन ऐवजी ओझोनचा वापर आादी विषयांचा समावेश होता. पर्यावरण संवर्धन ही नुसतीच सवय नसून ती संस्कृती होणे गरजेचे आहे, असे विचार मान्यवरांनी व्यक्त केले. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रशिक्षण विभागाच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. या वृक्षारोपणात विद्युत केंद्रातील विविध विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी भाग घेतला.
आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रदूषणावर चर्चा
By admin | Published: June 10, 2017 12:30 AM