लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे चंद्रपूरकर वैतागले आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मलेरिया, डेंग्यूसारखे आजार बळावले आहे. असे असतानाही महापालिकेकडून धूर फवारणी केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.सध्या वातावरणात कमालीचा अदलाबदल होत आहे. कधी पाऊस येतो तर कधी कडाक्याचे उन्ह पडत आहे. दिवसभर प्रचंड उकाडा जाणवत आहे. अशा वातावरणामुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. अशावेळी विविध प्रकारच्या औषधांची फवारणी, धूर फवारणी करणे गरजेचे असते. नागरी आरोग्य अबाधित रहावे, यासाठी महानगरपालिकेने नियमितपणे ही कामे करावयाची असतात. मात्र या कामाचा सध्या मनपालाच विसर पडल्याचे दिसून येत आहे.चंद्रपूरचा वाढता विस्तार बघता मनपा प्रशासनाची कामे सुरळीत पार पडण्याकरिता मनपाने झोननिहाय विभागणी केली आहे. तीन झोन कार्यालयातून हा कारभार चालविला जातो. महानगरपालिकेच्या कार्यालयात जेवढे विभाग आहेत, ते सर्व विभाग या झोन कार्यालयात कार्यान्वित झाले आहे. विविध औषधांची फवारणी आणि धूर फवारणीही याच झोन कार्यालयाच्या माध्यमातून केली जाते. वॉर्डनिहाय धूर फवारणी करण्याचे वेळापत्रकच महानगरपालिकेत तयार असते. असे असले तरी धूर फवारणी केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.औषधांची फवारणी आणि फागींग मशीनद्वारे केली जाणारी धूर फवारणी होत नसल्यामुळे अनेक वॉर्डात डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे. डासांमुळे चंद्रपूरकरांची झोपच उडाली आहे. यामुळे मलेरिया, डेंग्यूसारख्या आजाराने डोके वर काढणे सुरू केले आहे. चंद्रपूर शहरात मागील काही दिवसात तापाच्या रुग्णात दुपटीने वाढ झाली आहे. अनेक रुग्ण मलेरियाने बाधित होऊन खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे. डासांच्या प्रकोपामुळे चंद्रपूरकर वैतागले असतानाही मनपाला मात्र त्याचे काही देणे घेणे असल्याचे दिसून येत नाही.प्रत्येक झोनमध्ये तीन फॉगिंग मशीन्सडासांचा नायनाट करण्यासाठी इतर साधनांपेक्षा फॉगिंग मशीनने केलेली धूर फवारणी उपयुक्त ठरते. त्यामुळे प्रत्येक शहरात ही फवारणी नियमितपणे करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. महानगरपालिकेत एक चारचाकी वाहनांवर असलेली मोठी फॉगींग मशीन व तीनही झोन कार्यालयात प्रत्येक तीन फॉगिंग मशीन्स उपलब्ध असल्याची माहिती आहे. झोन कार्यालयाशी संलग्न असलेल्या प्रत्येक वॉर्डात आठ किंवा पंधरा दिवसाआड फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करणे आवश्यक आहे. मात्र काही वॉर्डाचा अपवाद सोडला तर चंद्रपुरातील बहुतांश वॉर्डात अद्यापही धूर फवारणी झाली नाही.नगरसेवकांनी गांभीर्याने लक्ष द्यावेशहरात नियमितपणे फॉगिंग मशीनद्वारे धूर फवारणी करण्याची जबाबदारी मनपा प्रशासनाची आहे. मात्र यात मनपा प्रशासन हलगर्जीपणा करीत असल्याने आता प्रत्येक प्रभागातील नगरसेवकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. नगरसेवकांनी आपल्या प्रभागात धूर फवारणी करण्यासाठी मनपा प्रशासनाला बाध्य करावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
वॉर्डावॉर्डात डासांचा प्रादुर्भाव; चंद्रपूरकर वैतागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:06 PM
मागील काही दिवसांपासून चंद्रपुरात डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे चंद्रपूरकर वैतागले आहेत. यामुळे रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून मलेरिया, डेंग्यूसारखे आजार बळावले आहे. असे असतानाही महापालिकेकडून धूर फवारणी केली जात नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
ठळक मुद्देविविध साथीच्या आजाराचे रुग्ण वाढले; मात्र महानगरपालिकेकडून धूर फवारणी नाही