वरोरा तालुक्यातील एका गावात मागील सहा महिन्यांपूर्वी एक कुटुंब मोलमजुरी करण्याकरिता आले. आई-वडील, १३ वर्षाची मुलगी व दहा वर्षाचा मुलगा असे कुटुंब. आई, वडील शेतावर कामाला गेले. घरी दोघे बहीण-भाऊ होते. मुलगी घरात ओल्या कपड्याने फरशी पुसत होती. त्यावेळी पंख्याची वायर हाताने बाजूला करीत असताना तिला शॉक लागला. गावात ही बाब माहीत होताच आई-वडिलांना बोलवण्यात आले. मुलीला शासकीय रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. घरची परिस्थिती बेताची असल्याने शवविच्छेदन केले नाही व मृतदेह घरी घेऊन आले. आता अंत्यसंस्कार करून टाकायचे असे ठरले असताना पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना बघून सर्व उपस्थित अवाक् झाले. पोलिसांनी आपली कार्यवाही करत मृतदेह ताब्यात घेतला व शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह आप्तेष्टांच्या ताब्यात दिला. त्यानंतरच अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कार थांबवून मृतदेहाचे विच्छेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:30 AM