लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित राजुरा येथील आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर येथील इयत्ता सातवीच्या विद्यार्थी व राष्ट्रीय हरित सेना विभागामार्फत पर्यवेक्षक तथा राष्ट्रीय हरित सेना विभागप्रमुख व इयत्ता सातवीचे वर्गशिक्षक बादल बेले यांच्या मार्गदर्शनात नुकतेच दगडांचे प्रदर्शन भरविण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शाळेच्या मुख्याध्यापिका नलिनी पिंगे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून राजू सावित्रीबाईं मारोती भोयर, आदर्श हायस्कूलचे मुख्याध्यापक सारीपुत्र जांभूळकर उपस्थित होते. इयत्ता सातवीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकात धोंडा नावाचा पाठ आहे. या पाठातील विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या दगडधोंडे संग्रहवृत्तीमुळे एक मोठा अनर्थ टळलेला होता. निरीक्षण क्षमता, प्रश्न विचारणे, संग्रह करणे, एखाद्या नवीन गोष्टीची माहिती समजून घेणे इत्यादी बाबींचा या पाठात समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दगडांचा संग्रह बघता यावा व दगडांविषयीची माहिती समजून घेता यावी, याकरिता हे प्रदर्शन भरविले होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक बादल बेले यांनी केले. आभार प्रदर्शन सहायक शिक्षिका जयश्री धोटे यांनी मानले.२ हजार दगडांचा संग्रहराजू भोयर यांनी सन २००५ पासून दगड संग्रहाला सुरुवात केली. वेगवेगळ्या प्रकारचे तब्बल दोन हजार दगड त्यांच्याकडे आहेत. यात विविध आकार, पक्षी-प्राण्यांची चित्र असलेले, इंग्रजी अक्षरे असलेले, धातुमिश्रित, चुनखडीचे, एकात एक मिश्रित आणि वेगवेगळ्या प्रकारांच्या दगडांचा समावेश आहे, तर काही दगडांमधे विजेच्या प्रकाशात वेगवेगळे रंग दिसतात. अशा विविध प्रकारचे दगड प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांना बघता आले, त्याची माहिती समजून घेता आली. जीवनात एका तरी गोष्टीचा छंद आपण जोपासला पाहिजे. संग्रह करायला अनेक क्षेत्र खुली आहेत. आपण आपली आवड लक्षात घेऊन आपले छंद जोपासले पाहिजेत, असे प्रतिपादन राजू भोयर यांनी यावेळी केले.
शालेय धडा शिकवण्यासाठी शाळेत भरविले दगडांचे प्रदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 09, 2021 1:32 PM