कन्हाळगाव येथील सुमन ठाकरे या भिसी प्रा. आरोग्य केंद्रात बी. पी. तपासणीसाठी आल्या असता डॉ. प्रियंका कष्टी यांनी बरवे परिचारिकेकडे तपासणीकरिता पाठविले. तेव्हा बरवे यांनी सदर रुग्णाला बी.पी. तपासण्याचे काम डाॅक्टरचे असल्याने परत डाॅक्टरकडे पाठविले. त्यामुळे डाॅक्टर कष्टी यांनी परिचारिका यांना विचारणा केली असता रुग्णांसमोर शाब्दिक वादाला सुरुवात झाली.
दरम्यान, त्यानंतर डॉ. प्रियंका कष्टी यांनी वंदना बरवे व आरती भटेले या दोन मानधन तत्त्वावर काम करणाऱ्या परिचारिकांना आपल्या कार्यालयात बोलावून डॉ. श्रीकांत काळे व डॉ. कष्टी यांनी मिळून मारहाण केल्याचा आरोप परिचारिकांनी केला आहे.
यासंदर्भात प्रस्तुत प्रतिनिधीने डॉ. कष्टी यांच्याशी संपर्क केला असता त्या म्हणाल्या, सुमन ठाकरे या रुग्णाचा बी.पी. तपासणी करण्यास सांगितले असता परिचारिका बरवे यांनी तपासण्याचे नाकारले. मी त्यांना कारण विचारले असता त्यांनी रुग्णांसमोरच अरेरावीची भाषा बोलण्यास सुरवात केली. नंतर त्यांना आपल्या कॅबिनमध्ये बोलावून समज देण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मला व माझे सहकारी डॉ. श्रीकांत काळे यांना अरेरावीची भाषा वापरून बघून घेण्याची धमकी दिली. नंतर स्वतःच्या अंगावर स्पिरिट ओतून आत्महत्येची धमकी दिली. त्यानंतर भिसी पोलिसांना सूचना देऊन प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलावून घेतल्याचे डॉ. कष्टी यांनी सांगितले.
दरम्यान, या संदर्भात भिसी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका कष्टी व डॉ. श्रीकांत काळे यांनी दोन्ही परिचारिकांविरोधात भिसी पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केल्याचे भिसीचे ठाणेदार मनोज गभने यांनी सांगितले.