चंद्रपूर : पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेत जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायती पात्र ठरूनही त्यांच्यासाठी आलेला निधी मात्र गावांपर्यंत पोहचलाच नाही. पर्यायाने या गावांवर या योजनेपासून वंचित राहण्याची पाळी आली आहे.दरम्यान, या प्रकाराला उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) विवेक बोंद्रे हे जबाबदार असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य विनोद अहीरकर यांनी केला आहे.ग्राम विकास कार्यक्रमांतर्गत पर्यावरण ग्राम समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेला निधी देण्यात आला होता. तिसऱ्या वर्षातील पात्र ग्रामपंचायतींसाठी हा एक कोटी ९५ लाख रूपयांचा निधी आला होता. या निधीच्या वितरणाचे आदेश तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ३ फेब्रुवारीला दिले होते. त्यानुसार विवेक बोंदे्र यांनी शासनाच्या बीडीएस प्रणालीतून ही रक्कम काढली. मात्र मात्र त्याचे देयक सादर करून चंद्रपूर कोषागारातून ती रक्कमच काढली नाही. परिणामत: जिल्हा परिषदेच्या वतीने ग्रामपंचायतींना या रकमेचे वाटप करता आले नसल्याची बाब उघडकीस आली आहे.हा प्रकार लक्षात आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बोंद्रे यांच्यावर १६ जूनला कारणे दाखवा नोटीस बजावला असून तीन दिवसात उत्तर मागितले आहे. त्यात, ही रक्कम अर्थसंकल्पिय प्रणालीमध्ये प्रलंबित दिसत असल्याचे म्हटले आहे. शासनाकडून या अखर्चित निधीबद्दल विचारणा झाली असून या निधीचा उपयोग जिल्हा परिषदेला करता न आल्याचा ठपका शासनाकडून ठेवण्यात आला आहे. या नोटीसला विवेक बोंद्रे काय उत्तर देतात, हे महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायती १.९५ कोटींपासून वंचित
By admin | Published: June 16, 2014 11:25 PM