संदीप बांगडे
सिंदेवाही : ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाचा वर्षातून एकदा येणारा बैलपोळा सण साजरा होतो. तान्हा पोळा लाकडी नंदीबैल सजावट करून बालगोपाळ पोळा साजरा करतात. मात्र, मागील दोन वर्षांपासून पोळा सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
ग्रामीण भागातील शेतकरी आपल्या लाडक्या बैलजोडीची पूजा करण्याकरिता बैलपोळा साजरा करीत असतात. ग्रामीण भागात बैलजोडीला पोळा सणानिमित्त दैवत मानतात. यानिमित्त बाजारातून विविध वस्तूंची खरेदी करून बैलांना सजविले जाते. शहरातील ग्रामीण भागातील मुख्य चौकात लाकडी नंदी बैलाचा तान्हा पोळा भरविला जातो. कुटुंबातील बालगोपाळ लाकडी नंदीबैल सजावट करून नेतात. काही ठिकाणी नंदीबैलाची स्पर्धासुद्धा आयोजित केली जाते. छोटे-मोठे लाकडी नंदी बैल सजावट करून विविध ठिकाणी स्पर्धा होते. सुदृढ बालक स्पर्धा तसेच नंदीबैल सजावट स्पर्धेत त्यांना नंदी बैलाला विविध उपक्रमांद्वारे बक्षीस आणि भेटवस्तू देण्यात येतात. यावेळी बालगोपाळांना बक्षीस म्हणून भोजारा देण्याची प्रथा ग्रामीण भागात आहे. लाकडी नंदी बैलाची तसेच पोळ्याची महागाई दरवाढ झालेली दिसत आहे. शाळेला सुट्या असूनही सण साजरे करण्यावर बंधने असल्यामुळे बालगोपाळ व शेतकरी बांधव निरुत्साही दिसत आहेत. शासनाचे नियमावलीनुसार उत्सव साजरा करण्यास मनाई केली असल्याने पोळा सणानिमित्त बालगोपाळांच्या आनंदावर विरजण पडले आहे.