आक्सापूर : उद्योग विरहित गोंडपिपरी तालुक्याची शेती आणि शेतमजुरीवर मदार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या मिळकतीचे धान्य शासकीय धान्य खरेदी केंद्रावर विकले. मात्र त्यांना बोनसची रक्कम अद्याप मिळालेली नाही. लॉकडाऊनमुळे नागरिकांचा रोजगार बुडाला. अशातच शेतकऱ्यांपुढे आता हंगामाचे दिवस आले. अशावेळी त्यांना आर्थिक चणचण भासू लागली आहे. यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेला बोनस शेतकऱ्यांना तत्काळ वितरित करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव कमलेश निमगडे यांनी केली आहे.
गोंडपिपरी तालुक्याची भिस्त शेती आणि शेतमजुरीवर आहे. या तालुक्यात रोजगाराचे ठोस साधन नाही. शेतीचा हंगाम आटोपला की तालुक्यातील नागरिक रोजगाराच्या शोधात इतरत्र भटकतात. अशातच सततच्या लाॅकडाऊनमुळे नागरिकांचा रोजगार बुडाला. परिणामी जनसामान्यांचे कंबरडे मोडले. आता ‘ब्रेक द चेन’ नंतर शासनाकडून निर्बंध हळूहळू शिथिल केले जात आहेत. अन् बळीराजा घराबाहेर पडून हंगामात व्यस्त झाल्याचे चित्र आहे. सन २०२०-२०२१ मधील खरीप हंगामातील धान्य बहुतांश शेतकऱ्यांनी गोंडपिपरी शासकीय धान्य खरेदी केंद्रावर विकले. या शेतकऱ्यांना ५० क्विंटलपर्यंत मिळणारा ७०० रुपये बोनस अद्याप मिळालेला नाही. परिणामी तालुक्यातील शेतकरी राज्य शासनाने जाहीर केलेल्या बोनसच्या प्रतीक्षेत आहेत. अशावेळी नवीन हंगाम कसतांना शेतकऱ्यांपुढे आता मोठे संकट निर्माण झाले आहे. यातच बी-बियाणे,खते,कीटकनाशके आदी खरेदी करताना शेतकऱ्यांची दमछाक होत आहे. आर्थिक विवंचनेत असलेल्या बळीराजाला ‘मदतीचा हात’ म्हणून राज्य सरकारने प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली,मात्र ती रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात यायला उशीर होत आहे. शेतकऱ्यांना तातडीने बोनसचे वाटप करावे,अशी मागणी कमलेश निमगडे यांनी केली आहे. त्यांनी या संबंधीचे निवेदन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना दिले आहे. यावेळी शिष्टमंडळात अनुसूचित जातीचे राजुरा विधानसभा अध्यक्ष सचिन फुलझेले, राजीवसिंह चंदेल, करंजीच्या सरपंच सरिता पेटकर, ग्रा.पं.सदस्य समीर निमगडे, महेंद्र कुनघाडकर उपस्थित होते.