गोंडपिपरी तालुक्यातील करंजी गणाच्या पंचायत समिती सदस्य भूमी पिपरे यांनी काही दिवसांपूर्वीच पंचायत समिती सभागृहात रक्षाबंधनाचा भावनिक सोहळा घेतला. यावेळी पंचायत समिती कार्यालयातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. त्यांना राखी बांधत संकटकाळात भगिनींची ‘रक्षा’ करण्याचे आवाहन त्यांनी बंधूरायांना केले होते. या भावनिक सोहळ्यात उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून आशीर्वाद स्वरूपात त्यांना दिलेली काही रक्कम जमा झाली. यात भर म्हणून पंचायत समिती सदस्य असलेल्या भूमी पिपरे यांनी आपल्या वर्षभराच्या मानधनाची रक्कम यात टाकली. आणि या एकत्रित रकमेतून करंजी, आक्सापूर, चेकपेल्लूर, चेकबेरडी, वडकूली, वढोली आणि चेकलिखितवाडा या शाळांमधील तब्बल ७२ विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण केले. यावेळी पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी शेषराव भुलकुंडे, गटशिक्षणाधिकारी धनराज आवारी, शिक्षण विस्तार अधिकारी नामदेव राऊत, केंद्रप्रमुख वंदना बोधे, पशुधन पर्यवेक्षक सीमा गडदे आदी उपस्थित होते.
मानधन आणि रक्षाबंधन कार्यक्रमातील रकमेतून शैक्षणिक साहित्याचे वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 4:34 AM