देवाडा : जिल्हा आरोग्य विभाग व प्राथमिक आरोग्य केंद्र, देवाडांतर्गत येणाऱ्या उपकेंद्र परिसरातील सिद्धेश्वर, आनंदगुडा, जंगुगुडा, पारधीगुडा, भेंडवी, सालेगुडा, गेरेगुडा, वरझडी, इसापूर, घोट्टा व गुडे या गावांतील नागरिकांना मच्छरदाणीचे आरोग्य कर्मचारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे हे वाटप करण्यात आले.
शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे
चंद्रपूर : सरकी ढेपीचे भाव गगनाला भिडल्याने दूध उत्पादक संकटात सापडले आहेत. शेतकरी दुग्ध व्यवसायासाठी गायी, म्हशी, शेळ्या आदी जनावरे पाळत आहेत. मात्र, वाढत्या महागाईमुळे हा व्यवसाय डबघाईस येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अनुदान वाढवून द्यावे, अशी मागणी आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त
चंद्रपूर : पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. मात्र, बहुतांश रस्त्यांवर खड्डे असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पर्यायी रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
वाहनधारकांवर कारवाई करावी
चंद्रपूर : शहरातील अनेक वाहनधारक नियमानुसार नंबर प्लेटवर नंबर न टाकता विविध कलर आणि डिझाइनमध्ये नंबर टाकतात. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बाहेर फिरणाऱ्यांची संख्या वाढली
चंद्रपूर : कोरोनाचे संकट आता काही प्रमाणात कमी झाले आहे. रुग्णसंख्याही घटत आहे. त्यामुळे बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. पहाटेच्या वेळी रस्त्याने मोठ्या संख्येने नागरिक फिरताना दिसत आहेत.
बसअभावी प्रवाशांची गैरसोय
शंकरपूर : शंकरपूर- भिसी या मार्गाने एकही बस उपलब्ध नसल्याने बस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. भिसी अप्पर तालुका असून, शासकीय कामासाठी येथे जावे लागत आहे, तसेच इतर कामांसाठीही नागरिकांना या रस्त्याने जाणे- येणे करावे लागते. मात्र, बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो.
बल्लारपूर-सिरोंचा रेल्वेमार्ग तयार करा
बल्लारपूर : येथून सिरोंचापर्यंत रेल्वेमार्ग तयार करण्यात यावा, अशी मागणी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांतील नागरिकांकडून होत आहे. बल्लारपूर- सिंरोचा रेल्वेमार्ग तयार झाल्यास नागरिकांना सोईचे होणार आहे.
मातीच्या ढिगाऱ्यावर झुडपे वाढली
गोवरी : राजुरा तालुक्यातील गोवरी, पोवनी, साखरी, सास्ती, गोयेगाव परिसरात वेकोलिने मातीचे महाकाय ढिगारे गावाच्या, शेताच्या लगत टाकले आहेत. या ढिगाऱ्यावर झुडपी जंगल निर्माण झाले असल्याने धोका होण्याची शक्यता आहे.
नाल्यांचा उपसा करण्याची मागणी
सावरगाव : नागभीड तालुक्यातील जीवनापूर येथील नाल्यांचा उपसा न झाल्याने नाल्या सांडपाण्याने तुंबल्या आहेत. काही भागांत नालीचे सांडपाणी बाहेर वाहत असते.
शेतकऱ्यांचे लक्ष आभाळाकडे
नागभीड : गेल्या सहा- सात दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाल्याने शेतकरी मोठ्या पावसाच्या अपेक्षेने आभाळाकडे डोळे लावून आहेत. यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासून पिकायोग्य पाऊस पडत आहे. आवते, पऱ्हे आणि रोवणी वेळेवरच झाली. मात्र, मागील पाच-सहा दिवसांपासून पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. आता अनेकांना शेतात थोडेतरी पाणी आवश्यक आहे.