राज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने २३ मार्चपासून लॉकडाऊन सुरू केले. यामुळे सर्व कामे बंद पडली आहेत. मागील वर्षापासून अशीच स्थिती असल्याने बांधकाम कामगारांना आर्थिक संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारकडून नोंदणीकृत असलेल्या बांधकाम कामगारांना दीड हजार रुपये देण्याची घोषणा केली. चंद्रपूर जिल्ह्यात १ लाख १९ हजार नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. त्यापैकी प्रत्येकी दीड हजार रुपये याप्रकारे ६८ हजार ८४६ बांधकाम कामगारांच्या खात्यात १० कोटी २६ लाख ६९ रुपये वळते करण्यात आले आहेत. उर्वरित बांधकाम कामगारांना मदत देण्यासाठीची प्रकिया सुरू आहे. शासनाच्या या मदतीने बांधकाम कामगारांना दिलासा मिळाला आहे.
बॉक्स
मदत देण्यात चंद्रपूर राज्यात दुसरे
मागील महिन्यापासून पात्र लाभार्थ्यांचा खात्यामध्ये रक्कम जमा करणे सुरू आहे. बांधकाम कामगारांना मदत देण्यामध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात दुसऱ्या स्थानावर आहे. सोलापूरमध्ये ६८ हजार ८२४ लाभार्थ्यांना मदत देण्यात आली आहे. त्यानंतर चंद्रपूर ६८ हजार ४४६ जणांना मदत दिली आहे. तर भंडारा जिल्ह्यात ६१ हजार ८३ जणांना मदत देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील उर्वरित बांधकाम कामगारांना मदत देण्याच्या अनुषंगाने प्रकिया सुरू आहे.
बॉक्स
नोंदणी करण्याचे आवाहन
चंद्रपूर जिल्ह्यात बांधकाम कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, बहुतांश जण नोंदणी करण्याकडे कानाडोळा करतात. तर काही जण नोंदणीचे नूतनीकरण करण्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी शासनातर्फे विविध योजनांचा लाभ देण्यात येतो. त्यामुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगारांनी बांधकाम कामगार कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.
कोट
शासनस्तरावरून बांधकाम मजुरांसाठी विविध योजना राबविल्या जातात. जिल्ह्यात १ लाख १९ हजार ४०० नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत. त्यापैकी पात्र ६८ हजार ४४६ लाभार्थ्यांच्या खात्यात प्रत्येकी दीड हजार याप्रमाणे १० कोटी २६ लाख ६९ हजार रुपये वळते करण्यात आले आहेत. उर्वरित बांधकाम कामगारांची प्रक्रिया सुरू आहे. त्यांनासुद्धा लवकरच मदत देण्यात येईल.
-नितीन पाटणकर, सहायक कामगार आयुक्त, चंद्रपूर
-----
नोंदणी केलेले बांधकाम मजूर १,१९,०००
मदत मिळालेले बांधकाम मजूर ६८,४४६