लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रित राहावी, यासाठी नागरिकांनी मास्कचा वापर, सुरक्षित अंतर पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, याकडे दुर्लक्ष केल्या जात असल्याने सर्व सार्वजनिक ठिकाणांची कडक तपासणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनान शनिवारी पथक तयार केले. या पथकाकडून विवाहसोहळे, मंगल कार्यालय, जिमखाना, नाईट क्लब, रेस्टॉरंट्स, सिनेमा हॉल, धार्मिक स्थळे, खेळाची मैदाने, बगीचा, शॉपिंग मॉल्स व खासगी कार्यालयांची तपासणी केली जाणार आहे. सार्वजनिक, घराबाहेर व लोकांचा वावर असलेल्या ठिकाणी मास्क लावला नाही आणि अशा ठिकाणी थुंकताना आढळल्यास ५०० रुपयाचा दंड वसूल करण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले होते. परंतु, नागरिकांच्या दुर्लक्षामुळे बाधितांची संख्या वाढू लागली. नियमांचे उल्लंघन करून वाटेल त्या पद्धतीने फिरताना दिसत असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या मार्गदर्शनात ग्रामीण भागात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले व चंद्रपूर मनपा क्षेत्रात आयुक्त राजेश मोहिते यांच्या देखरेखीखाली तपासणी पथके तयार करण्यात आली. सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ग्रामविकास अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांना आपापल्या क्षेत्रात दररोज तपासणी करणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिले.
विवाह सोहळ्यासाठी ५० व्यक्तींचीच मर्यादालग्न व इतर तत्सम कार्यक्रमासाठी ५० व्यक्तींची मर्यादा ठेवण्यात आली. इतर सभा, बैठका, सामूहिक समारंभ व सांस्कृतिक कार्यक्रमात बंदिस्त सभागृहात २५ टक्के अथवा १०० व्यक्तींपैकी कमी मर्यादा आहे. कार्यक्रमासाठी पोलीस विभागाची परवानगी बंधनकारक आहे.
२४ तासात २२ कोरोनाबाधितचंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासात १८ जणांनी कोरोनावर मात केल्याने रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. २२ कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली आहे. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २३ हजार ३३९ वर पोहोचली आहे. सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २२ हजार ८२१ झाली आहे. सध्या १२२ बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख आठ हजार ९२७ नमुन्यांची तपासणी झाली. त्यापैकी एक लाख ८३ हजार ९८५ नमुने निगेटीव्ह आले आहेत. आतापर्यंत ३९६ बाधितांचे मृत्यू झाले .
सभागृह, मंगल कार्यालयावर निर्बंध कोरोनाचे नियम न पाळल्यास सभागृह, मंगल कार्यालय, लॉन जागेचे मालक व व्यवस्थापकावर ५ हजार, दुसऱ्यांदा उल्लंघन केल्यास १० हजार व तिसऱ्यांदा २० हजार आणि कार्यक्रम आयोजकावरही १० हजाराचा दंड ठोठावण्यात येणार आहे. दरम्यान, नायब तहसीलदारांनी आज चंद्रपुरातील तुकूम मार्गावरील महेश भवन संचालकाकडून ५ हजाराचा दंड वसूल केला.