सुभाष धोटे जिल्हा काँग्रेसचे नवे जिल्हाध्यक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 12:35 AM2019-01-25T00:35:20+5:302019-01-25T00:35:56+5:30
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश देवतळे यांच्या जागेवर काँग्रेसचे केंद्रीय प्रतिनिधी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांची वर्णी लावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीने चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी प्रकाश देवतळे यांच्या जागेवर काँग्रेसचे केंद्रीय प्रतिनिधी, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आमदार सुभाष धोटे यांची वर्णी लावली आहे. जिल्ह्यात पक्ष नेतृत्वात काँग्रेसश्रेष्ठींनी केलेल्या बदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या बदलामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत नव्या समीकरणाचे संकेत पक्षश्रेष्ठींनी दिल्याचे बोलले जात आहे.
बुधवारी रात्री सुभाष धोटे यांची वर्णी चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी लागल्याचे अ.भा.काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी के.सी. वेणुगोपाल यांच्या स्वाक्षरीचे पत्र सोशल मिडियावर धडकले.
यानंतर चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये एकाएकी उत्साह संचारला. अनेकांनी रात्रीला नवनियुक्त जिल्हाध्यक्ष धोटे यांच्याशी संपर्क साधून आनंद केला. आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नेमका कोण असेल, याबाबत सर्वत्र उत्सुकता वाढली असताना अचानक पक्षनेतृत्त्वात झालेल्या बदलामुळे लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस दमदार चेहरा उतरविण्याचे संकेत मिळाले आहे.
सुभाष धोटे हे माजी आमदार स्वर्गीय रामचंद्रराव धोटे यांचे ज्येष्ठ पूत्र आहे. १९७१ मध्ये विद्यार्थी संघाचे अध्यक्षपद स्वीकारुन राजकीय प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरूवात केली.
१९७५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे एनएसयूआयचे अध्यक्ष, १९७८ मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस, १९७९ मध्ये जिल्हा परिषदेचे कृषी सभापती, जि.प.चे हंगामी अध्यक्ष, १९८६ मध्ये चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, १९९२ ते १९९३ व १९९७ ते १९९८ दोनदा राज्य सहकारी बँक ( शिखर बँक) नागपूर विभागाचे अध्यक्ष, १९९५ मध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष आणि २००९ मध्ये राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१६ पासून विदर्भ मार्केटिंग फेडरेशन नागपूरचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
अशा दांडग्या राजकीय अनुभवाची दखल काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांनी घेतली असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांमधून ऐकायला येत आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांत नवीन ऊर्जा व जोश निर्माण करण्याची ही जबाबदारी आहे. ती पूर्ण ताकदीनिशी पार पाडण्याचा प्रयत्न राहील. जिल्ह्यातीलच नव्हे तर चंद्रपूर लोकसभा मतदार संघातून कार्यकर्त्यांनी दूरध्वनीद्वारे आनंद व्यक्त केला आहे. या निवडीचे श्रेय अ.भा. राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष खा. राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, प्रदेश प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे, विधिमंडळ उपगटनेता तथा जिल्ह्याचे नेते विजय वडेट्टीवार यांना जाते.
- सुभाष धोटे, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष,
काँग्रेस कमिटी, चंद्रपूर.