घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : नगर परिषद क्षेत्रातही ग्रामीण मग्रारोहयोच्या धर्तीवर नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्यालयाने येथील नगर परिषदेस दिले आहेत. त्यामुळे आता नगर परिषद क्षेत्रातील नागरिकांना रोजगार मिळणार आहे. नागभीड नगर परिषद ही क वर्गातील नगर परिषद आहे. ११ एप्रिल २०१६ रोजी या नगर परिषदेची स्थापना झाली. नगर परिषदेसाठी आवश्यक असलेल्या लोकसंख्येचा मेळ जमविण्यासाठी आजूबाजूच्या नऊ ग्रामपंचायती या नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आल्या. सुलेझरी, भिकेश्वर, चिखलपरसोडी, बोथली, ब्राह्मणी, डोंगरगाव, नवखळा, तुकूम या ग्रामपंचायतींचा यात समावेश आहे. नगर परिषदेत समाविष्ट होण्यापूर्वी या ग्रामपंचायतींच्या हद्दीतील नागरिकांचे शेती आणि रोजगार हमीची कामे हेच उत्पन्नाचे प्रमुख साधन होते. मात्र, नगर परिषदेत समावेश झाल्यापासून या गावातील नागरिकांना रोजगार हमीच्या कामापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, या नागरिकांच्या आर्थिक अडचणीत चांगलीच वाढ झाली असून यातूनच रोजगाराची ही मागणी पुढे आली होती. शेतीची कामे संपली की, या गावातील लोकांना कोणतीही कामे नसतात. नोव्हेंबर महिन्यापर्यंत शेतीची कामे चालतात. पण, त्यानंतर या लोकांना रिकामेच राहावे लागते. तसाही नागभीड नगर परिषदेचा दर्जा ‘क’ आहे. शासनाच्या एका निर्देशानुसार क वर्गात असलेल्या नगर परिषदांकडे कार्यक्षेत्रातील नागरिकांनी रोजगाराची मागणी केली, तर रोहयोमधून रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे शासनाचे निर्देश आहेत. यासाठी काही मार्गदर्शक सूचनाही शासनाकडून दिल्या आहेत. या निर्देशाचा आधार घेऊनच ब्राह्मणीवासीयांनी ही मागणी केली होती. नुसती मागणीच नाही, तर ५६७ व्यक्तींनी नमुना फाॅर्म क्रमांक ४ भरून दिले होते.
तलाव व नाला खोलीकरणाची कामेनागभीड नगरपरिषद खेड्यांची मिळून बनली आहे. या खेड्यांमध्ये त्यावेळच्या ग्रामपंचायतींनी नियोजन करून, तलाव खोलीकरण, नाला खोलीकरण, वृक्षलागवड, पांदण रस्ते आदी विविध बाबींवर रोजगार उपलब्ध करून दिला होता. असेच किंवा शासनाने क वर्गातील नगरपरिषदांना रोजगार हमीच्या कामांबाबत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियोजन करून रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा प्रतिक्रिया या संदर्भात व्यक्त होत आहेत.
क वर्गातील न.प. क्षेत्रातील नागरिकांना मग्रारोहयोच्या धर्तीवर रोजगार उपलब्ध करून द्यावा, असे शासनाचे जुनेच निर्देश आहेत, पण नागभीड न.प.कडून या निर्देशाची अंमलबजावणी होत नव्हती. या संदर्भात मी लोकांकडून रोजगाराचे फार्म भरून घेतले व पाठपुरावा केला. त्याचे हे फलित आहे.- अमृत शेंडे, माजी सरपंच बाह्मणी.